‘अ‍ॅक्सेंचर’ने 11 हजार कर्मचाऱ्यांना काढले!

आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) हे नवे तंत्रज्ञान नोकऱ्यांचा काळ बनून पुढे येत आहे. आयटी व व्यवस्थापन सल्लागार कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसत असून ‘अ‍ॅक्सेंचर’ या कंपनीने मागच्या तीन महिन्यांत 11 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू दिला आहे. घटणारे क्लायंट आणि एआयचा वाढता वापर ही मुख्य कारणे कंपनीने यासाठी दिली आहेत.

अ‍ॅक्सेंचरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युली स्वीट यांनी कर्मचारी कपातीमागची भूमिका मांडली आहे. ज्या पदांवरील कर्मचाऱ्यांचे पुनर्प्रशिक्षण शक्य नाही किंवा तितका वेळ देणे व्यवहार्य ठरणार नाही, ती पदे कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना जलदगतीने पुन्हा प्रशिक्षित केले जाऊ शकत नाही. क्लायंटच्या मागणीनुसार, कर्मचारी एआय आधारित सेवेला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत आणखी कर्मचाऱ्यांना काढले जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑगस्ट 2025 अखेरीस अ‍ॅक्सेंचरकडे जगभरात एकूण 7,79,000 कर्मचारी होते. त्याच्या तीन महिने आधी ही संख्या 7,91,000 इतकी होती. कंपनी सध्या सर्वच स्तरांवर पुनर्रचना करीत असून त्यामुळे नोव्हेंबर 2025 पर्यंत कर्मचारी कपात सुरूच राहणार आहे. या कपातीमुळे एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बचत होईल, असा अंदाज आहे.

एआय कौशल्य हवेच!

कर्मचारी संख्या कमी करण्यासोबतच कर्मचाऱ्यांनी उच्च दर्जाची कौशल्ये शिकावीत यासाठी अ‍ॅक्सेंचर कंपनी प्रयत्नशील आहे. त्यासाठी एजंटिक एआयवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. एजंटिक एआय हे जटिल निर्णय घेणारे आणि ऑपरेशनल कामे स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी डिझाईन केलेले एक तंत्रज्ञान आहे. नव्याने येणाऱ्या एआय तंत्रज्ञानामध्ये प्राविण्य मिळवणे हाच आता नोकरी टिकवण्याचा आणि करियर करण्याचा एकमेव मार्ग आहे.