
राज्यात सर्वसामान्य लोक गॅस सिलिंडरसाठी भरउन्हात कित्येक तास रांगेत उभे असल्याचे चित्र सर्वत्र आहे. पण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन मंदिरांना पाच गॅस सिलिंडर पुरवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. यावरून शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी लोढा यांच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. लोढांनी भेदभाव करून मंत्रीपदाच्या शपथेचा भंग केला असून मुख्यमंत्र्यांनी लोढांचा राजीनामा घेण्याची मागणी अनिल परब यांनी केली आहे
सध्या सर्वसामान्यांना गॅस सिलिंडर मिळत नाही. हॉटेल बंद आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन मंदिरांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्याची मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. चैत्र महिन्यात ओली आयंबील हा जैन धर्मातील एक धार्मिक उत्सव असतो. यानिमित्त आंबील हे पेय भक्तांना दिले जाते. त्यामुळे प्रत्येक मंदिराला पाच गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मी कोणताही भेदभाव करणार नाही, अशी मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण विशिष्ट ठिकाणीच गॅस सिलिंडर देण्याचे सांगून त्यांनी शपथेचा भंग केला आहे, असा आरोप अनिल परब यांनी केला. राज्यातील प्रत्येक नागरिकाला इंधन मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मग जैन देरासरला गॅस सिलिंडर देण्याची मागणी करून भेदभाव का केला? त्यांनी शपथेचा भंग केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.





























































