मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील अपघात- सीआरएसचा रिपोर्ट सांगणार नेमके काय घडले?

मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जीवघेण्या वळणावर समोरासमोर येणाऱ्या दोन फास्ट लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या आणि चार प्रवाशांचे बळी गेले. या घटनेची चौकशी आता कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी म्हणजे सीआरएसतर्फे होणार आहे. सीआरएसच्या अहवालानंतर नेमका अपघात कसा झाला याचा उलगडा होणार आहे.

अशी होणार चौकशी
सीआरएसने रुळांची चाचणी केल्यानंतरच लोकलची वेगमर्यादा निश्चित केली जाते. तसेच कॉम्प्युटर आणि सॅटेलाईटवर प्रत्येक लोकलच्या वेग मर्यादेची नोंद होते. त्यामुळे या वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यामुळे हा अपघात झाला आहे का, दुर्घटनेदरम्यान दोन्ही ट्रेनचा वेग काय होता, याची चौकशी केली जाणार आहे.

सोमवारी मुंब्यात झालेल्या भयंकर अपघातानंतर अवघ्या देशभरातून रेल्वेच्या निष्क्रियतेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन हादरले आहे. त्यातच मुंब्यात झालेला अपघात कसा झाला याची माहिती देताना मध्य रेल्वेच्या पीआरओंनी तीन ते चार वेगवेगळी कारणे सांगितली. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अखेर हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी म्हणजेच सीआरएसच्या माध्यमातून करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे.