तब्बल 39 वर्षांनी न्याय; चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यात आरोपी पुराव्याअभावी निर्दोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरीतील साकीनाका परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यातील आरोपीला तब्बल 39 वर्षांनी सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने आरोपीची सुटका केली. पुरेसे पुरावे आणि साक्षीदार उपलब्ध नसल्यामुळे आरोपींवरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीला दोषी धरणे कायदेशीररित्या शक्य नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली.

30 सप्टेंबर 1987 रोजी अंधेरीतील साकीनाका परिसरात एका टोळीने मनोर नायडू, सय्यद अमीर आणि शंकर तायडे यांच्यावर चाकू हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी 1988 मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, सबळ साक्षी-पुराव्याअभावी खटल्याची सुनावणी तब्बल 40 वर्षे रखडली. अखेर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित लौलकर यांनी आरोपी नासिर इब्राहिम दादन याची हत्येचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत करण्याच्या आरोपातून सुटका केली आहे. घटना घडली तेव्हा दादन याचे वय अवघे 19 वर्षे होते, आज तो 58 वर्षांचा आहे.

खटला प्रदीर्घ काळ चालल्यामुळे अनेक मुख्य साक्षीदारांचा मृत्यू झाला, तर काही जण सापडू शकले नाहीत. केवळ एका पोलीस हवालदाराची साक्ष नोंदवण्यात आली, जी ऐकीव माहितीवर आधारित आहे. वैद्यकीय अहवाल आणि फॉरेन्सिक पुरावे न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. तसेच, तपास अधिकाऱ्याची साक्षही नोंदवण्यात आली नाही, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.