
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) चा शास्त्रज्ञ असल्याचे भासवून परदेशी निधी मिळवणाऱ्या 60 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अख्तर हुसेनी असे अटक केलेल्या बनावट शास्त्रज्ञाचे नाव आहे. तो स्वतःला शास्त्रज्ञ असल्याचे भासवत संस्थेत येत-जात असे. हुसेनीकडून अणुशस्त्रांशी संबंधित दहाहून अधिक नकाशे आणि कथित डेटा देखील जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि नकाशांची पोलील चौकशी करत आहेत.
हुसेनीने 1995 पासून BARCचा शास्त्रज्ञ असल्याचे भासवून संवेदनशील अणु डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा परदेशी निधी मिळवला. या कागदपत्रांचा वापर बेकायदेशीर किंवा हेरगिरीच्या कामांसाठी करण्यात आला होता का, याचाही तपास केला जात आहे. आरोपीने ही माहिती कोणत्या स्रोतांकडून मिळवली आणि त्याचा खरा हेतू काय होता याचाही तपास केला जात आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून अनेक बनावट पासपोर्ट, आधार आणि पॅन कार्ड आणि एक बनावट BARC आयडी देखील जप्त केले आहे. एका आयडीवर त्याचे नाव अली रजा हुसेन असे होते, तर दुसऱ्याने त्याचे नाव अलेक्झांडर पामर असे ठेवले होते. त्याने या बनावट ओळखपत्रांचा वापर करून वारंवार संस्थेत प्रवेश केल्याचा पोलिसांना संशय आहे.
मुंबई पोलिसांचे सायबर सेल आणि इंटेलिजेंस युनिट आता आरोपीच्या कॉल रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणांची सखोल चौकशी करत आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की त्याने गेल्या काही महिन्यांत अनेक बनावट ओळखपत्रे तयार केली होती. आरोपीची चौकशी केली जात आहे आणि सुरक्षा एजन्सी तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनुसार, हुसैनी बंधूंना 1995 मध्ये परदेशी निधी मिळू लागला. बीएआरसी आणि इतर अणुऊर्जा प्रकल्पांशी संबंधित गुप्त ब्लूप्रिंटच्या बदल्यात हे पैसे देण्यात आल्याचा संशय आहे. पोलिसांनी हुसैनीचा भाऊ आदिल यालाही दिल्लीतून अटक केली आहे.
तपासादरम्यान अख्तर हुसैनीच्या नावे एक खाजगी बँक खाते देखील सापडले आहे. या खात्यात संशयास्पद व्यवहार आढळले असून निधीची नेमकी रक्कम आणि स्रोत निश्चित करण्यासाठी पोलिसांनी बँकेकडून संपूर्ण व्यवहार तपशील मागितला आहे. तसेच दोन्ही भावांनी वापरलेली इतर अनेक बँक खाती देखील बंद केली. संपूर्ण पैशाचा तपशील तपासण्यासाठी पोलीस जुन्या बँक खात्यांचे रेकॉर्ड तपासत आहेत.



























































