
सुनावणी झाल्यानंतर आरोपीला सत्र न्यायालयातल्या तिसऱ्या मजल्यावरील लॉकअपमध्ये जमा करण्यासाठी घेऊन निघालेल्या पोलीस गार्डला चकवा देऊन आरोपी पळाल्याची घटना मंगळवारी घडली. 24 तास उलटून गेले तरी तो आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
हरिसन अँथनी जोसेफ (42) असे त्या पळालेल्या आरोपीचे नाव असून तो मुसाफिर खाना येथील न्यू स्टेला इमारतीत राहतो. हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुह्यात अटक झाल्याने तो न्यायालयीन कोठडीत होता. त्रिवार मंगळवारी तारखेला सत्र न्यायालयातील रुम नंबर 10 येथे आणण्यात आले होते. सुनावणी झाल्यानंतर अन्य तिघा आरोपींची सुनावणी होईपर्यंत जोसेफला न्यायालयात असलेल्या लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी अंमलदार प्रशांत कांबळे हे घेऊन चालले होते. तिसऱ्या मजल्यावरून ते दुसऱ्या मजल्यावर आले असता आरोपीने कांबळे यांच्या हाताला जोराचा हिसका देत त्यांना ढकलले व चकवा देत तेथून पळ काढला. तो न्यायालयातून सटकण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अंमलदार कांबळे यांनी तक्रार दिली. कुलाबा पोलीस आरोपी जोसेफ याचा शोध घेत आहेत. जोसेफ मुंबईबाहेर पळाल्याची शक्यता आहे.




























































