मध्यरात्री उपचारासाठी नेत असताना आरोपी पळाला; कोपरगाव पोलिसांची पुन्हा नाचक्की

शिर्डीतील सागर शेजवळ खूनप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीस पोलीस उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात नेत असताना आरोपी दुचाकीवरून उडी मारून फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोपरगाव येथील कारागृहात मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे कोपरगाव पोलिसांची पुन्हा नाचक्की झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

सन 2015 साली शिर्डीतील सागर शेजवळ या दलित तरुणाची हत्या झाली होती. या प्रकरणातील नऊ आरोपींपैकी योगेश सर्जेराव ऊर्फ गोटय़ा पारधे (रा. कोल्हार, ता. राहाता, जि. नगर) हा एक आरोपी आहे. तो न्यायालयीन कोठडीमध्ये कोपरगाव कारागृहात जेरबंद होता. मध्यरात्री रक्ताची उलटी झाली आणि छातीत दुखत असल्याचे सांगत पारधे याने रुग्णालयात घेऊन जाण्याची पोलिसांना विनंती केली. त्यास दुय्यम कारागृह कोपरगाव येथून उपचारांसाठी कोपरगाव येथे ग्रामीण रुग्णालयात पोलीस दुचाकीवरून घेऊन जात होते. यावेळी वाबळे हॉस्पिटलजवळील टी पॉइंटवर दुचाकीचा वेग कमी झाला. याचा फायदा उठवीत आरोपी योगेश पारधे दुचाकीवरून उडी मारून फरार झाला.

विशेष म्हणजे, आरोपीला उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत डय़ुटीवरील पोलिसाने संबंधित अधिकाऱयांची परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. दोन आरोपी व पोलीस असे तिघे दुचाकीवरून जाताना या आरोपींना बेडय़ा घातल्या नव्हत्या. योगेश पारधे हा आरोपी पळून गेल्यानंतर पोलिसाने दुसऱया आरोपीच्या मदतीने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू ढाकणे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याप्रकरणी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे व पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा तपास करीत आहेत.