एसटीच्या थांब्यावरील हॉटेल चालकाने अवाच्या सवा दर लावल्यास होणार कारवाई

सर्वसामान्य एसटी प्रवाशांना माफक दरात चहा, नाश्ता, जेवणासह स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून महामंडळाने वेगवेगळ्या मार्गावरील हॉटेलच्या ठिकाणी अधिकृत थांबे दिले आहेत. मात्र सदरच्या ठिकाणी एसटी प्रशासनाने निश्चित करून दिल्याप्रमाणे 30 रूपयांमध्ये नाश्ता मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून ज्या अधिकृत थांब्यावरील हॉटेल चलकाकडून अवाच्या सवा दर आकरले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गावरील हॉटेलच्या ठिकाणी अधिकृत थांबे दिले आहेत. सदर हॉटेलमध्ये प्रवाशांने तिकीट दाखवल्यास त्यांना सवलतीच्या दरात चहा, नाश्ता, जेवण दिले जाते. त्यामुळे हॉटेल चालकांचाही चांगला व्यवसाय होत आहे. मात्र काही हॉटेल चालकांकडून ठरल्याप्रमाणे 30 रूपयांमध्ये नाश्ता दिल्या जात नसल्याच्या तक्रारी एसटी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत संबंधित तक्रारीबाबत चौकशी करण्याचे निर्देश महाव्यवस्थापक (नियोजन आणि पणन) यांनी दिले आहे. त्यानुसार वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापकांनी आपल्या पथकाच्या माध्यातून तपासणी करून कारवाई करावी, तसेच त्याबाबतचा अहवाल विभाग नियंत्रकास सादर करावयाचा आहे.

 एखाद्या अधिकार्याने कारवाई करताना कुचराई केल्यास त्यांच्यांवरही कारवाईचा बडगा उगरला जाईल असेही महाव्यवस्थापकांनी बजावले आहे.