Mumbai news – अंधेरीतील रहिवासी इमारतीवर गोळीबार, बॉलीवूड अभिनेता KRK ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता, लेखक, निर्माता आणि स्वंयघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान (केआरके) याला अटक केली आहे. अंधेरीतील ओशिवरा भागातील रहिवासी इमारतीवरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी केआरकेला बेड्या ठोकल्या असून शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री केआरकेला त्याच्या स्टुडिओतून ताब्यात घेण्यात आली. पोलीस चौकशीदरम्यान त्याने 18 जानेवारी 2026 रोजी आपल्या परवानाधारक शस्त्रातून अंधेरीतील निवासी इमारतीवर 4 राऊंड गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र जप्त केले.

नेमकं प्रकरण काय?

ही घटना 18 जानेवारी रोजी घडली आहे. अंधेरीतील ओशिवारा भागातील एका निवासी इमारतीवर 4 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळीबाराचा कारण अद्याप स्पष्ट झालेले नसते तरी यामागे कोणालाही इजा करण्याचा आपला हेतू नव्हता, असे केआरकेने पोलिसांना सांगितले.

केआरकेने पोलीस जबाबात दिलेल्या माहितीनुसार, तो आपली बंदुक साफ करत होता आणि त्याची रेंज तपासण्यासाठी त्याने घरासमोरील खारफुटीच्या दिशेने गोळ्या झाडल्या. तो भाग सुरक्षित असावा असे आपल्याला वाटत होते. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक गोळी लांबवर गेली आणि दुसरी ओशिवरा भागातील इमारतीला लागली.

दरम्यान, संबंधित इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा राहतात, तर चौथ्या मजल्यावर मॉडेल प्रतीक बैद राहतात. सुरुवातीला पोलिसांकडे गोळीबार करणाऱ्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती, मात्र तांत्रिक तपासाअंती या घटनेत केआरकेचा सहभाग असल्याचे समोर आले. सध्या खान पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.