महायुती सरकारमध्ये सध्या पुरघोडीचे राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असणारे सनदी अधिकारी डॉ. इक्बालसिंह चहल यांची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. गृह विभाग फडणवीस यांच्याकडे असताना मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील चहल यांच्याकडे गृह विभागाची सूत्रे देऊन त्यांच्यावर मात केल्याची चर्चा आहे.
गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असताना सुजाता सौनिक यांची 30 जून 2024 रोजी राज्याच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी राज्य सरकारने गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार सौनिक यांच्याकडेच ठेवला होता.
बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेने राज्यात उसळलेली संतापाची लाट, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जाणारा प्रश्न या पार्श्वभूमीवर डॉ. चहल यांची गृह विभागात बदली केल्याचे सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याची चर्चा आहे.
चहल यांनी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर चहल यांची पालिकेतून बदली करून त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदावर करण्यात आली. गृह विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याची थेट गृह विभागात नियुक्ती केली आहे. कारण पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणुकाच्या काळात आपल्या मर्जीतील अधिकारी गृह विभागात पाठवून गृहखात्यावर अंकुश ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे.
मुख्य सचिवपदी वर्णी लावण्याची मिंध्यांची योजना
आता गृह विभागाच्या महत्त्वाच्या जबाबदारीनंतर चहल यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लावण्याची मुख्यमंत्र्यांची योजना आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यूपीएस मदान यांची 4 सप्टेंबरला मुदत संपत आहे. मदान यांच्या जागी नियुक्ती करण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक या अर्ज करणार असल्याची चर्चा आहे. सौनिक यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास इक्बालसिंह चहल यांचा राज्याच्या मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्याचा मार्ग आपोआप मोकळा होईल. पण सनदी अधिकारी अपूर्व चंद्रा, राजीव जलोटा, राजेश पुमार व राजेश अगरवालही ज्येष्ठ आहेत. अपूर्व चंद्रा व राजेश अगरवाल सध्या दिल्लीत प्रतिनियुक्तीवर आहेत. या सर्वांची इकबालसिंह चहल यांच्यापेक्षा सेवाज्येष्ठता असली तरी या सर्वांची सेवाज्येष्ठता मागे ठेवत मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील चहल यांच्या गळय़ात मुख्य सचिवपदाची माळ पडणार असल्याची जोरदार चर्चा आहे.