येत्या काही दिवसांत येणाऱ्या गणेशोत्सव व विविध धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर पाटण उपविभागीय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या अतिसंवेदनशील गावांत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेतली जात असून, या काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांनी दिला.
पाटण तालुक्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवासह विविध धार्मिक सणांना सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने पाटण उपविभागीय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पाटण, मोरगिरीसह अतिसंवेदनशील विभागात जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रायकिंग फोर्ससह पाटण पोलिसांचे संचलन करण्यात आले. यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सदगर, विकास शिंदे, कोयनानगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप शितोळे यांची उपस्थिती होती.
विजय पाटील म्हणाले, पाटण तालुक्याला सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा राखण्याची परंपरा लाभली असून, आजपर्यंत पाटण तालुक्यात कुठेच जातिभेद, मतभेद अथवा दंगल असे प्रकार घडले नाहीत, याचा आपणास अभिमान वाटतो. हीच परंपरा कायम राखली जावी, या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पाटण पोलीस ठाण्यापासून लायब्ररी चौक, जुना बसस्थानक, झेंडा चौक, नवीन बसस्थानक, रामापूर, मोरगिरी शहरात पोलिसांचा रुटमार्च काढण्यात आला. या रुटमार्चमध्ये स्ट्रायकिंग फोर्सचे जवान, पोलीस कर्मचारी, होमगार्ड व पोलीस वाहने असा मोठा ताफा सहभागी झाला होता.