अभ्युदय नगर पुनर्विकासाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; शिवसेनेची मागणी

काळाचौकी  येथील अभ्युदय नगरचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम पसरलेला आहे. शासनाने तातडीने अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाचा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.

मुंबईतील काळाचौकी येथील अभ्युदय नगरच्या एकत्रित पुनर्विकासासाठी म्हाडाकडून 1 डिसेंबर रोजी 2021 रोजी मुद्देनिहाय खुलासा पाठवण्यात आला आहे. त्यात 740 चौरस फुटांची सदनिका व रेरा कार्पेट प्राप्त होऊ शकेल असा स्पष्टपणे नमूद केले आहे. या वसाहतीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात  स्थानिक लोकप्रतिनिधींनी सरकारकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केलेला आहे. विकास नियंत्रण निमावली 33/5 अंतर्गत सी अॅण्ड डीमार्फत वसाहतीच्या पुनर्विकासासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचा 6 मार्च 2024 रोजी शासन निर्णय जारी झाला असला तरी पुनर्विकासाचे काम सुरू झाले नसल्याकडे अजय चौधरी यांनी लक्ष वेधले.

या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी सात वेळा टेंडर काढण्यात आले.  त्यात विकासकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने टेंडर रद्द करण्यात आले. त्यानंतर एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत 635 चौरस फुटांवरून 620 चौरस फुटांच्या घरांचे नवीन टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात तीन विकासकांनी सहभाग घेतला, पण शासनाने पुनर्विकासासाठी कोणतीही घोषणा केली नाही असे चौधरी म्हणाले.