
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज संसदेत केंद्रीय मंत्र्यांशी राष्ट्रीय प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. पर्यावरण रक्षणासाठी महाराष्ट्राप्रमाणे देशभरात प्लॅस्टिकबंदी करावी आणि विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, रस्ते बहुउपयोगी आणि स्मार्ट हायवे बनवावेत अशा महत्त्वाकांक्षी संकल्पना त्यांनी यावेळी मांडल्या. सर्वसामान्य, गोरगरीब वंचितांना शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
पर्यावरणाच्या ऱहासाला कारणीभूत ठरणाऱया प्लॅस्टिकवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आल्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा घटला आहे. प्लॅस्टिकबंदीचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्यामुळे संपूर्ण देशात प्लॅस्टिकबंदी करावी यासाठी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना निवेदन दिले. नॅशनल हायवे ऑथोरिटीच्या माध्यमातून संपूर्ण देशात सध्या महामार्गांचे काम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. हे रस्ते स्मार्ट हायवे बनवावेत यासाठी आदित्य ठाकरे यांनी अत्याधुनिक उपाययोजना सुचवल्या आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना याबाबत त्यांनी निवेदन दिले. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सौरऊर्जेची निर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, इकोफ्रेंडली टॉयलेटस्, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, दिव्यांगांसाठी सुविधा सुरू कराव्यात अशी संकल्पना त्यांनी मांडल्या आहेत.
यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, लोकसभेतील गटनेते खासदार आनंदराव अडसूळ, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव-पाटील, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, संजय जाधव, रवींद्र गायकवाड, कृपाल तुमाने, श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्यासह युवासेना सचिव वरुण सरदेसाई, नगरसेवक अमेय घोले, साईनाथ दुर्गे उपस्थित होते.
…तर महिलांवरील अत्याचार थांबतील
देशभरात सध्या महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांना विद्यार्थी स्तरावरच सक्षम करण्यासाठी देशभरातील मुलींना पाचवीपासून स्वसंरक्षणाचे धडे देण्यास सुरुवात करावी, अशी महत्त्वपूर्ण संकल्पनाही आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे. याबाबत त्यांनी मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन दिले आहे. यामध्ये मुलांनाही मुलींशी सौजन्याने वागण्याचे धडे द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. यामुळे महिलांवरील अत्याचार थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बेकायदा डोनेशन घेणाऱयांवर निर्बंध घाला
आरटीई कायद्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश करून सध्याच्या प्राथमिक शिक्षणासाठी आरटीई कायद्यात सुधारणा करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मानवी संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. प्रवेशाची जाचक प्रक्रिया आणि बेकायदा डोनेशन घेणाऱयांवर निर्बंध घाला अशी मागणीही त्यांनी केली आहे. पालकांना त्यांच्या मुलांचे प्रवेश घेताना त्यांचे उत्पन्न, राहण्याचे ठिकाण, शिक्षण अशा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. या किचकट प्रक्रियेमुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.
वांद्रे-वरळी सी लिंक शेजारी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने सभागृह उभारणार
वांद्रे-वरळी सी लिंक शेजारील जागेची उपलब्धता असेल तर या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोठे स्मारक उभे करू, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. बाळासाहेबांचे माझे खूप जुने ऋणानुबंध आहेत. मुंबईत मोठे नाटय़गृह नाही. अशा वेळी बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे मोठे ऑडिटोरियम तसेच बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याचा आपला मानस गडकरींनी बोलून दाखविला.
दादरच्या आर. के. वैद्य रोड येथील प्रफुल्लबन सोसायटी येथे शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या देखण्या कार्यालयाचे गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी, विनोद घोसाळकर, मनोहर साळवी, संजय कदम आदी उपस्थित होते.

























































