भाजपच्या महाराष्ट्रद्वेषी मानसिकतेमुळे छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज विमानतळ आणि नवी मुंबईतील नवीन विमानतळाचे दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण गेली चार वर्षे रखडले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या विमानतळांचे नामकरण करून त्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. मात्र अद्यापही याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. या विषयात तातडीने हस्तक्षेप करून विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लावा, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री के.राममोहन नायडू यांना एका पत्राद्वारे केले आहे.
केंद्रात टीडीपी आणि जेडीयू यांच्या पाठिंब्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये चंद्राबाबू यांच्या विश्वासातील राममोहन नायडू यांच्याकडे हवाई वाहतूक खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या जबाबदारीबद्दल आदित्य ठाकरे यांनी नायडू यांचे या पत्राद्वारे अभिनंदनही केले आहे. केंद्रातील नव्या आघाडी सरकारमधील तुमच्या पक्षाच्या सहभागामुळे कामकाजात अधिक सर्वसमावेशकता दिसून येईल आणि एनडीए सरकारमधूनही लोकशाहीच्या संरक्षणार्थ भूमिका घेतली जाईल, असा आशावाद आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
या पत्राची प्रत ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या महाराष्ट्रद्वेष्टय़ा मानसिकतेचा समाचार घेतला आहे. भाजप सरकारने महाराष्ट्रावरील रोषामुळे गेली चार वर्षे छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईतील विमानतळांचे नामकरण रखडवले आहे. याबद्दल वारंवार विनंती करूनही महाराष्ट्रविरोधी भाजप सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत. वास्तविकदृष्टय़ा अत्यंत साधीशी अशी ही बाब तुम्हीच लक्ष घालून मार्गी लावावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
पालघर जिह्यातील प्रस्तावित विमानतळाकडे वेधले लक्ष
महाविकास आघाडी सरकारने पालघर जिह्यातही विमानतळ उभारणीच्या कामाची सुरुवात माझ्या विनंतीने केली होती. मुंबई महानगर प्रदेशात असा तिसरा विमानतळ उभारला गेल्यास या भागातील आणि पश्चिम किनारी प्रदेशातील प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ होऊ शकते. वारंवार विनंती करूनही हा प्रस्ताव भाजपने दुर्लक्षिला असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
एका प्रादेशिक अस्मितेचे तुम्ही प्रतिनिधित्व करत असल्यामुळे राज्यांच्या भावभावना तुम्ही चांगल्याच प्रकारे जाणता. यामुळेच आमच्या विनंतीचा विचार करून तुम्ही महाराष्ट्रातील जनभावनेचा योग्य तो सन्मान आणि आदर कराल अशी आशा करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.