
‘महापुराच्या आपत्तीतून आपण उभे राहिलात; गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे. तुम्ही हाक मारा… शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. जात, धर्म आणि भाषा न पाहता प्रत्येकाला घरोघरी येऊन मदत करू’, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. पूरग्रस्तांच्या हिमतीला दाद देत स्वतःची पर्वा न करता बचावकार्य करणाऱया सर्वांनाच यावेळी आदित्य ठाकरे यांनी जाहीर सलाम केला.
सोमवारी सिंधुदुर्ग जिह्यातील पूरग्रस्तांची भेट घेऊन, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्यानंतर रात्री उशिरा शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कोल्हापुरात दाखल झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास शहरात पूर आलेल्या बापट कॅम्प परिसरात भेट देऊन पूरग्रस्त नागरिक आणि गणेश मूर्तिकारांना धीर दिला. यावेळी पिण्याच्या पाण्यासह जीवनावश्यक वस्तू; तसेच शिध्याचेही पूरग्रस्तांना आदित्य ठाकरे यांनी वाटप केले. यावेळी शिवसेना नेते व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील,म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आदी उपस्थित होते.
n शिवसेनेचे खासदार, आमदार यांच्याकडील ज्या काही 22 मागण्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्या आहेत, त्याची पूर्तता करून घेऊ, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिली. यावेळी पूरग्रस्तांना शिवसाहाय्य मदत केंद्राच्या वतीने साहित्याचे वाटप करण्यात आले.
n आदित्य ठाकरे यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, भेंडवडे, खोची; तसेच शिरोळ तालुक्यातील कवठेसार, नांदणी येथील पूरग्रस्त भागांची पाहणी करून ग्रामस्थांना दिलासा दिला. शिवसेनेतर्फे आठवडाभरात शैक्षणिक साहित्य देण्यात येणार असल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी महिलांना धीर दिला.



























































