शिवाजी पार्कमधील शिवरायांच्या पुतळय़ाच्या देखभालीकडे दुर्लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवरायांच्या पुतळय़ाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेला तक्रारी करूनही दखल घेत नाही, अशी खंत शिवसेना आमदार महेश सावंत यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे व्यक्त केली.

महेश सावंत पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी पार्क मैदानात महाराजांचा अश्वारुढ पुतळा आहे. या पुतळय़ाची दुर्दशा झाली आहे. 1 मे रोजी शिवरायांचा पुतळय़ाला हार घालतात, पण तो एक-दोन महिन्यांनी काढला जातो. पुतळय़ाची व्यवस्था चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी मी सतत सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिकेकडे पाठपुरावा करतो. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱयांनी पुतळय़ाच्या देखरेखीची जबाबदारी स्वीकारली, पण तरीही पुतळय़ाच्या स्वच्छतेत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेकडे सतत पाठपुरावा केला, पण लक्ष दिले जात. पण शिवरायांच्या पुतळय़ाची रंगरंगोटी करून चांगल्या प्रकारे देखभाल करावी अशी मागणी त्यांनी केली.