नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून एमआयडीसी येथे वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार आहे. मतमोजणी परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता मतमोजणी परिसरात नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलिीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत.
मतमोजणी ठिकाणी मतमोजणी कामी अधिकारी/कर्मचारी तसे उमेदवार प्रतिनिधी व निकाल जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थीत राहणार आहेत. ही मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी तसेच निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येणार्या कार्यकर्ते व नागरीकांचा वाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यकर्ते व नागरिकांचे सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नागापुर एमआयडीसी येथे येण्या-जाण्याच्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
साईरत्न हॉटेल चौक, एल अॅण्ड टी कॉलनी पारस कंपनीपर्यंत जाणारा रस्ता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ लगतचे चारही बाजुचे रस्ते नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आले आहेत. परवानगी दिलेले शासकीय वाहने, संरक्षण विभागाची वाहने, स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेली वाहने यांना हा आदेश लागू राहणार नाही. हा आदेश 4 जून रोजीच्या पहाटे 1 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत लागू राहिल असे आदेशात म्हटले आहे.
मुख्य निवडणूक अधिकार्यांनी केली मतमोजणी परिसराची पाहणी नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघासाठीची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे. या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी रविवारी भेट देऊन पहाणी केली. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक रविकुमार अरोरा, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिस्त, अरुल कुमार, नगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांच्यासह सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र वखार महामंडळ येथे नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होणार्या गोदाम क्रमांक 1 व गोदाम क्रमांक 3 येथील व्यवस्थेची पाहणी करून मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने उपस्थित अधिकार्यांना त्यांनी सूचनाही केल्या.
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी मंगळवारी होत आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, नगर येथे सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. नगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. 1 येथे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.3 मध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय स्वतंत्र मिडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल
नगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात शेवगाव पाथर्डी, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा व कर्जत जामखेड असे सह विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपुर व नेवासा असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी 14 टेबल लावण्यात आले आहेत.
मतमोजणी फेर्या पुढील प्रमाणे विधानसभा मतदार संघ निहाय असणार्या व मतदान केंद्रनिहाय होणार्या मतमोजणी फेर्या याप्रमाणे असतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले 22 फेर्या, संगमनेर 20 फेर्या, शिर्डी 20 फेर्या, कोपरगाव 20 फेर्या, श्रीरामपुर 23 फेर्या तर नेवासा 20 फेर्या होणार आहेत. नगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव पाथर्डी 27 फेर्या, राहुरी 22 फेर्या, पारनेर 27 फेर्या, नगर शहर 21 फेर्या, श्रीगोंदा 25 फेर्या तर कर्जत जामखेड 26 फेर्या होणार आहेत. या निवडणुकीचा कल दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत समजणार असून पूर्ण निकाल येणास रात्रीचे 10 वाजण्याची शक्यता आहे.