वाढवण बंदरासाठी प्रशासनाची दडपशाही; अधिकारी पोलीस फौजफाट्यासह गावात घुसले, जमिनी ताब्यात घेण्याकरिता सर्वेक्षण सुरू

महाविनाशकारी वाढवण बंदर लादण्यासाठी सरकारने आता दडपशाही सुरू केली आहे. जमिनी ताब्यात घेण्याकरिता आजपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून अधिकारी पोलीस फौजफाट्यासह डहाणू तालुक्याच्या वरोर गावात घुसले. ही बाब समजताच स्थानिक भूमिपुत्रांनी धाव घेऊन या सर्वेक्षणाला जोरदार विरोध केला. मात्र पोलिसी बळाच्या जोरावर सर्वेक्षण केल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. वरोरवासीयांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांसमोर ‘चले जाव’च्या घोषणा दिल्या. तीन दिवस हे सर्वेक्षण चालणार असून डहाणूमध्ये तणावाचे वातावरण आहे.

वारंवार आंदोलने, न्यायालयीन लढा लढूनही वाढवणवासीयांच्या माथी केंद्र सरकारने बंदर लादले आहे. त्यासाठी हजारो एकर जमीन ताब्यात घेतली जाणार असून बंदरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. त्याशिवाय असंख्य मच्छीमार कुटुंबे देशोधडीला लागणार आहेत. दहाहून अधिक वर्षे वाढवणच्या विरोधात भूमिपुत्रांचा लढा सुरूच आहे. आज जमिनी ताब्यात घेण्याकरिता अधिकाऱ्यांचा ताफा डहाणूच्या वरोर गावात आला. संरक्षण कंपाऊंड तोडून हा ताफा शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा स्फोट झाला.

वाढवण बंदराकरिता जमिनीवरील झाडे, विहिरी, बोअरवेल, तलाव, व्यावसायिक मत्स्य तलाव आदींची मोजणी तसेच मूल्यांकन करण्याचे काम भूसंपादन विभागामार्फत आजपासून सुरू झाले आहे.

यापुढे जबरदस्तीने घुसाल तर याद राखा !
सर्वेक्षणाबाबतची नोटीस ग्रामपंचायतीचे कार्यालय व तलाठी चावडी येथे लावण्यात आली होती. तसेच गावात दवंडीही पिटवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी देताच ग्रामस्थ आणखीनच संतापले. काल दवंडी देता आणि आज तुम्ही सर्वेक्षण करण्यासाठी येता ही कोणती पद्धत, असा थेट सवाल केला. यापुढे आमच्या शेतात जबरदस्तीने घुसाल तर याद राखा. तुम्हाला हाकलून देऊ, असा इशाराही भूमिपुत्रांनी दिला आहे.

पोलिसांसह अधिकारी व कर्मचारी वरोर गावामध्ये आल्याचे समजताच परिसरातील शेतकरी व महिला यांनी तातडीने धाव घेतली. तसेच अधिकारी ‘चले जाव’ अशा घोषणा दिल्या.

या सर्वेक्षणाची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना दिल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला, पण ग्रामस्थांबरोबर त्यांची जोरदार बाचाबाची झाली. विशेषतः महिला प्रचंड संतापल्या होत्या.