गेल्या वर्षी भाजपला देणगीतून किती पैसे मिळाले माहिती आहे का ?

1112

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या संस्थेने राजकीय पक्षांना 20 हजारांहून अधिकच्या रकमेतून मिळालेल्या देणगीतून किती पैसा मिळाला आहे याचा अहवाल सादर केला आहे. 2018-2019 या आर्थिक वर्षासाठीचा हा अहवाल असून या अहवालात सगळ्या राजकीय पक्षांना मिळून 951. 66 कोटी रुपयांचे दान मिळाल्याचं सांगण्यात आले आहे. 2017-2018 या वर्षी या दानाची रक्कम ही 481.77 कोटी इतकी होती. म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम दुप्पट झाली होती.

ADR ने सादर केलेल्या अहवालात दान देणाऱ्यांची एकूण संख्या ही 5 हजार 520 इतकी होती. प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये राजकीय पक्षांना दान देणाऱ्या व्यक्तीने 20 हजारापेक्षाचे दान दिले असेल तर त्याची एकूण रक्कम किती होते हे जाहीर करणं भाग आहे. लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत ते बंधनकारक करण्यात आलेले आहे. प्रत्येक पक्षाच्या खजिनदाराला 20 हजारापेक्षा जास्त दान मिळाल्यास त्याची माहिती मिळत असते. काँग्रेसला गेल्या आर्थिक वर्षात 148.58 कोटींचे दान मिळाले होते.

ज्या राजकीय पक्षांना सर्वाधिक दान मिळाले आहे त्या पक्षांच्या यादीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2017-2018 साली काँग्रेसला 26.66 कोटींचे दान मिळाले होते. त्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात काँग्रेसला मिळालेल्या दानाच्या रकमेत बरीच वाढ झाल्याचे दिसते आहे. मायावती यांच्या बसपने आपल्याला गेल्या आर्थिक वर्षात 20 हजारापेक्षा अधिकच्या रकमेचे एकानेही दान दिले नसल्याचं म्हटलंय. गेल्या आर्थिक वर्षात तृणमूल काँग्रेसला 44.26, राष्ट्रवादी काँग्रेसला 12.05 कोटी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 3.02 कोटी तर भाकपाला1.6 कोटींचे दान मिळाले होते.

राजकीय दान मिळवणाऱ्या पक्षांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. भाजपला गेल्या आर्थिक वर्षात 742.15 कोटींचे दान मिळाले आहे. जे इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत 3.5 पटीने अधिक आहे. 2017-2018 साली भाजपला दानातून 437.04 कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच त्या वर्षीच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात भाजपला दानापोटी मिळणाऱ्या रकमेमध्ये जवळपास 305 कोटींपेक्षा अधिकची वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या