
राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या दुहेरी खून खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. या खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी ते नगर न्यायालयात हजर झाले.
राहुरी येथील ऍड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी ऍड. मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचे 25 जानेवारी 2024 रोजी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. त्याच दिवशी रात्री तालुक्यातील उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत आढाव दाम्पत्याचे मृतदेह आढळले होते. याप्रकरणी पोलिसांनी किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (रा. उंबरे), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा), शुभम संजित महाडिक (रा. मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे), बबन सुनील मोरे (रा. उंबरे) या पाच आरोपींना गजाआड केले होते. या हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला होता.
दरम्यान, जिह्यासह राज्यभरातील वकील संघाकडून मोर्चे व आंदोलन करीत हा खटला जलदगती न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
खून खटला 6 मे 2024 रोजी नगर न्यायालयात सुरू झाला. आज ऍड. आढाव दाम्पत्य खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर झाले. आरोपी किरण दुशिंग याच्या वतीने एस. एस. पाठक व आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे याच्या वतीने पी. के. फळे हे वकील हजर झाले आहेत. दरम्यान, आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज आज 20 स्वीकारण्यात आला. आरोपी शुभम संदीप महाडिक यानेही आज माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सदर खटला नगर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. यारलागड्डा यांच्यासमोर सुरू आहे.