
बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्या वक्तव्याने आज साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यांनी चक्क विनेश फोगाटला निवृत्तीच्या निर्णयाबद्दल पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. पण ते पुढे म्हणाले, तिला फक्त कुस्तीच खेळायची असेल तर तिने आवर्जून खेळावी. कुस्तीत राजकारण खेळू नये, असा मोलाचा सल्लाही देऊन टाकला.
संजय सिंह यांना बृजभूषण शरण सिंह यांचे हस्तकच मानले जात असल्यामुळे ते नेहमीच टीकेचे धनी झाले आहेत. आंदोलक कुस्तीपटूंना ते आणि त्यांना कुस्तीपटू नेहमीच पाण्यात पाहताहेत. त्यामुळे एकमेकांबद्दल कधीच चांगले सूर निघाले नाहीत. मात्र आज संजय सिंह यांना आपल्या बोलबच्चनगिरींनी फोगाटला बुचकळ्यात पाडले. त्यांनी विनेशला कुस्तीतील निवृत्ती मागे घेण्याचे आवाहन केल्यामुळे आता नवे काय म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण पुढे त्यांनी त्या वाक्याला जोडलेल्या वाक्याने त्यांच्या आवाहनाला आव्हानाचाच रंग लाभला.
विनेशच्या पुनरागमनामुळे महिला कुस्तीपटूंना प्रेरणा मिळेल आणि नव्या पिढीला नव्या दमाचे खेळाडू लाभतील. त्यांच्या या वाक्याने अनेकांना स्फुरणही चढले. पण पुढे त्यांनी आपणही राजकारणीच असल्याचे वक्तव्य करून कुस्तीची मस्ती केली. ज्या हिशेबाने विनेश हल्ली राजकीय मंचावर दिसतेय, त्यानुसार तिने भविष्यात राजकारणच करायला हवे. मग तिने कुस्तीत राजकारण खेळू नये, असाही सल्ला संजय सिंह यांनी दिला.
विनेश राजकारणात उतरणार आहे का याबाबत संजय सिंह यांनी चकार शब्दही काढला नाही. ते फक्त म्हणाले, तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. तिने कुठेही जावे. पण जर ती स्पर्धात्मक कुस्तीत पुनरागमन करत असेल तर आमचे तिला पूर्ण सहकार्य असेल. 2023 मध्ये देशातील कुस्तीपटूंच्या आंदोलनाने कुस्ती महासंघाला चांगलाच धडा दिल्याचे ते सांगायला विसरले नाही.
विरोधकांनी कुस्ती ठप्प केली
आम्हाला पॅरिसमध्ये कुस्तीत सहा पदकांची अपेक्षा होती, परंतु देशात कुस्तीविरोधी शक्ती उभी राहिली आणि कुस्ती 18 महिने ठप्प झाली. या आंदोलनामुळे हिंदुस्थानी कुस्ती महासंघाच्या आशाआकांक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. या आंदोलनामुळे ऑलिम्पिकमध्ये आम्हाला केवळ एकच पदक मिळू शकले. कुस्ती आणि राजकारणाला वेगळे ठेवायला हवे. त्यामुळे आंदोलनात उभ्या राहिलेल्या कुणाचेही मला नाव घ्यायचे नाहीय. कुस्तीत राजकारणाने घुसखोरी केल्यामुळे पॅरिसमध्ये आमचे खूप मोठे नुकसान झालेय.
नुकत्याच जॉर्डनमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिला कुस्ती सुसाट आहे आणि भविष्यातही महिला कुस्तीचे पाऊल पुढेच पडणार असल्याचे ते म्हणाले. फक्त आमच्या कामकाजात डोकावणाऱ्या दोन-चार संस्थांनी आमच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये. असे घडल्यास आम्ही ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीतच पाच पदके जिंकू, असा विश्वासही व्यक्त केला.