शिर्डीच्या तीन विमानांची संभाजीनगरात इमर्जन्सी लॅण्डिंग

1063

शिर्डी विमानतळावरील आकाशात घिरट्या घालून, वाईट हवामानामुळे शिर्डी विमानतळावर विमान उतरविण्यास परवानगी न मिळाल्याने, एका पाठोपाठ तीन विमानांची संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एमरजेंसी लॅण्डींग करण्यात आली. या तीन विमानांतून तब्बल ४०२ प्रवासी संभाजीनगर विमानतळावर उतरले. या प्रवाशांना शिर्डीच्या दर्शनासाठी बस आणि खासगी वाहनामधून पाठविण्यात आले.

aeroplane, emergency, landing, shirdi, aurangabad

गुरूवारी संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हैदराबादच्या ट्रु जेटच्या विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांना अचानक विमानतळावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय संभाजीनगर विमानतळावरील एअर टॉवरच्या अधिकाऱ्यांनाही काही विमाने संभाजीनगरच्या दिशेने येत असल्याचा निरोप देण्यात आला. त्यानंतर दुपारी ४.३० च्या सुमारास बंगलुरू-शिर्डी हे बोईंग विमान संभाजीनगरच्या धावपट्टीवर उतरले. या विमानातून १८१ प्रवाशांना उतरविण्यात आले. यानंतर काही वेळातच विमानतळाच्या दिशेने आलेल्या दिल्ली-शिर्डी या बोर्इंग विमानालाही उतरविण्यात आले. या विमानातून १४३ प्रवासी उतरले. यानंतर चेन्नईहून शिर्डीकडे येणारे बोम्बारडीअर विमान उतरविण्यात आले. या विमानातून ७८ प्रवासी उतरले.

या सर्व प्रवाशांना आधी संंभाजीनगर विमानतळावर थांबविण्यात आले. नंतर या विमानतळावर उतरविण्याचे कारण सांगण्यात आले. लागलीच स्पाईस जेटच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांना शिर्डीकडे पाठविण्याची व्यवस्था सुरू केली. यातील काही विमान प्रवाशांना विशेष बसमधून तर काही प्रवाशांना खासगी वाहनातून शिर्डीला रवाना करण्यात आले. या विमान प्रवाशांना सुखरूप पाठविल्यानंतर स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अचानक विमानतळावर वाढलेल्या विमानाच्या आगमनामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेसह अग्निशामक दलाची व्यवस्थाही तयार ठेवण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या