देश  विदेश – 22 दिवस उलटले… झुबीन गर्गच्या  मृत्यूबाबत सिंगापूरकडून कोणतीही माहिती नाही

प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत 22 दिवस उलटूनही आसाम पोलिसांना अद्याप सिंगापूरकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. हिंदुस्थान सरकारने सिंगापूरकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाची माहिती मागितली आहे, असे सीआयडीचे विशेष डीजीपी मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी सांगितले.

झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. सिंगापूरमधील सीआयडीने घटनेच्या वेळी नौकेवर उपस्थित असलेल्या 11 जणांना समन्स बजावले आहे. तथापि, फक्त एकानेच जबाब नोंदवला आहे. झुबीन यांची पत्नी गरिमा यांनी सोशल मीडियावर न्यायाची मागणी करत राहण्याचे आवाहन लोकांना केले आहे. झुबीन यांच्या मृतदेहाचा व्हिसेरा अहवाल गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सादर करण्यात आला आहे.  तो लवकरच सार्वजनिक केला जाईल, असे समजतेय.