
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचे रहस्य आता काही दिवसांमध्ये उलगडणार आहे. या खजिन्यातील सोने, चांदी, हिरे आणि मौल्यवान रत्नांबद्दल नेहमीच उत्सुकता राहिली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून खजिन्याची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुभ मुहूर्त दुपारी १२:०९ ते १:४० दरम्यान होता. मंदिराच्या परंपरेनुसार, या वेळेत रत्नांची मोजणी सुरू झाली आहे. यापूर्वीची मोजणी १९७८ मध्ये झाली होती. ४८ वर्षांनंतर पुन्हा ही मोजणी केली जात आहे. त्यावेळी १२८ किलो सोने आणि २२१ किलो चांदी होती. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, ४८ वर्षांनंतर बुधवारी जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याची बहुप्रतिक्षित यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनानुसार, नियुक्त कर्मचारी सकाळी ११:३० च्या सुमारास पारंपरिक धोतर आणि टॉवेल परिधान करून मंदिरात दाखल झाले आहेत. दुपारी १२:०९ ते १:४५ या निर्धारित शुभ मुहूर्तावर वस्तूंची मोजणी प्रक्रिया सुरू झाली. केवळ या मोजणी आणि सूचीकरणासाठी अधिकृत असलेल्यांनाच आत प्रवेश दिला जातो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रक्रियेदरम्यान मंदिरातील दैनंदिन पूजेवर कोणताही परिणाम होणार नाही.
दैनंदिन पूजेत वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांपासून मोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर रत्न भांडाराचा बाहेरील गाभारा आणि शेवटी आतील गाभारा उघडला जाणार आहे. शेवटची सूची १३ मे ते २३ जुलै १९७८ दरम्यान तयार करण्यात आली होती. त्यावेळी, १२८.३८ किलोग्रॅम वजनाच्या ४५४ सोन्याच्या आणि २२१.५३ किलोग्रॅम वजनाच्या २९३ चांदीच्या वस्तू, तसेच अनेक मौल्यवान रत्नांची नोंद करण्यात आली होती. १९७८ सालच्या प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी ७२ दिवस लागले होते, तर यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ती कमी वेळेत पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सूची तयार करताना, दोन रत्नपारखी वस्तू ओळखण्यासाठी मदत करत आहेत आणि प्रत्येक वस्तूचे डिजिटल छायाचित्रण केले जात आहे. सोन्याचे दागिने पिवळ्या कापडात, चांदीचे दागिने पांढऱ्या कापडात आणि इतर वस्तू लाल कापडात गुंडाळून सहा विशेष तयार केलेल्या पेट्यांमध्ये ठेवल्या जातात. या संपूर्ण प्रक्रियेत मंदिराचे सेवक, सरकारी बँकांचे अधिकारी, रत्न तज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी यांचाही सहभाग असतो.


























































