54 वर्षांनंतर माणूस पुन्हा चंद्रावर स्वारी करणार, नासाची ‘आर्टेमिस-2’ मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रावर पहिले पाऊल ठेवून 54 वर्षे उलटल्यानंतर मानव आता पुन्हा चंद्रावर स्वारी करणार आहे. त्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने आर्टेमिस-2 ही मोहीम हाती घेतली असून आज चार अंतराळवीर चंद्राच्या दिशेने झेपावले. या अंतराळवीरांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हे चारही अंतराळवीर दहा दिवस चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार आहेत.

हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सकाळी 3.54 मिनिटांनी ओरियन हे यान फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून झेपावले. या यानात रीड वाइसमन, व्हिक्टर ग्लोवर, ख्रिश्टिना कोच आणि जेरेमी हॅनसेन हे चौघे अंतराळवीर आहेत. हे लँडिंग मिशन नसल्याने अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत. चंद्रापासून हजारो मैल दूर राहून ते विविध गोष्टींचा अभ्यास करतील. मात्र, ही मोहीम पुढच्या मोहिमांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

2028 मध्ये प्रत्यक्ष चांद्रभूमीवर

आर्टेमिस-2 मोहिमेसाठी ओरियन हे खास यान बनवण्यात आले आहे. या मोहिमेत ओरियनच्या क्षमतेचाही कस लागणार आहे. 2028 मध्ये माणसाला चंद्रावर उतरवण्याची नासाची योजना आहे. त्यासाठी ओरियन सोबतच स्पेसेक्स आणि ब्लू ओरिजिनने बनवलेल्या इतर यानांचाही वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी 1972 मध्ये पहिल्यांदाच मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले होते. मात्र, त्यानंतर नासाने चांद्रमोहिमांकडे दुर्लक्ष करून तुलनेने पृथ्वीपासून जवळच्या आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसारख्या मोहिमांवर लक्ष केंद्रित केले होते.