
गणेशोत्सवात चढ्या दराने विकली जाणारी फळे आता बाप्पाच्या विसर्जनानंतर मात्र घसरली आहेत. पूर्वी 200 रुपये किलो दराने विकले जाणारे सफरचंद आता 120 रुपयांवर आले असून एक किलो डाळिंबासाठी 220 ऐवजी 140 रुपये मोजावे लागत आहेत. सर्वच फळांच्या किमती सुमारे 25 टक्क्यांनी घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवात पूजाअर्चा, प्रसाद व पाहुणचार यासाठी मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी केली जाते. त्यामुळे या कालावधीत सफरचंद, संत्री, मोसंबी, सीताफळ आदी फळांचे भाव झपाट्याने वाढले होते. गणेशोत्सवामुळे बाजारात काही प्रमाणात उभारी आली होती. मात्र सण संपल्यानंतरही आवक सुरू असली तरी विक्रीत मंदी जाणवत आहे. घाऊक बाजारात भाव घसरले असले तरी किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना चढे भाव मोजावे लागत आहेत.
असे उतरले दर
पनवेलमधील घाऊक बाजारात सफरचंदांचा भाव तब्बल 200 रुपये किलोपर्यंत गेला होता. मात्र सण संपल्यानंतर भाव कमी होऊन सध्या 70 ते 120 रुपये किलोवर आला आहे. संत्र्यांचा भाव 20 ते 40 रुपये किलोपर्यंत, पेरू 12 ते 25 रुपये, टरबूज 31 ते 33 रुपये, पपई 15 ते 23 रुपये, सीताफळ 20 ते 120 रुपये, तर मोसंबीचा दर 26 ते 36 रुपये किलो इतका आहे.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक फळ बाजारात रोज सरासरी साडेतीन ते चार हजार क्विंटल सफरचंद, पाचशे क्विंटल संत्री व दीड हजार क्विंटल सीताफळाची आवक होत आहे. मात्र सध्या पावसाच्या संततधारेमुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मागणीत मोठी घट झाल्याने भाव खाली आले असल्याचे फळ व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.