
पंजाबमध्ये पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली रूपनगर येथून जसबीर सिंग नावाच्या आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे. जसबीर सिंग हा जान महल नावाचे एक यूट्यूब चॅनल चालवतो. तो आणि ज्योती मल्होत्रा एकमेकांच्या संपर्कातही होते. जसवीर सिंग हा पाकिस्तान गुप्तचर संस्थेचा गुप्तचर अधिकारी शाकीर यांच्या संपर्कात होता. तसेच त्याने तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे; त्याच्या फोनमधुन अनेक पाकिस्तानी नंबर सापडले आहेत.
दानिशच्या निमंत्रणावरून जसवीर सिंग यांनी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली होती. जसबीर सिंगचे शाकीर उर्फ जट्ट रंधावाशी संबंध उघड झाले आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील हिसार येथून नुकतीच अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राच्या चौकशीदरम्यान आरोपी जसबीरचे नाव पुढे आले होते. हा आरोपी ज्योती मल्होत्राशी संबंधित होता. त्यांनी एकमेकांशी अनेक वेळा बोलले देखील आहे.
पाकिस्तानी हेर ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली मोठी मागणी, पैसे नाहीत..
ज्योती मल्होत्राच्या माध्यमातून आरोपी जसबीर हा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील हद्दपार अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात आला. प्राथमिक तपासात पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमधून काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. त्याचवेळी, त्याच्या फोनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर संस्थेतील काही लोकांचे नंबरही सापडले आहेत. त्याने हे नंबर वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केले होते.
आरोपीला आज मोहाली जिल्हा न्यायालयात हजर केले जाईल. ते सादर केल्यानंतर, त्याचा रिमांड घेतला जाईल. रिमांड दरम्यान पोलिस त्याची चौकशी करतील. यामध्ये आणखी काही लोकांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांना आहे. पोलिसांनी आरोपींची माहिती गुप्तचर विभागाला दिली आहे. आरोपीशी संबंधित माहिती गुप्तचर विभागानेच पंजाब पोलिसांसोबत शेअर केली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. लवकरच केंद्रीय सुरक्षा एजन्सी देखील आरोपीच्या चौकशीत सहभागी होईल.


























































