भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लातूर तालुक्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा येथील एका तरुणानेही गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर लातूर जिह्यातील अहमदपूर तालुक्यातील एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. ही घटना ताजी असतानाच रविवारी अजून एक आत्महत्या झाल्याचे उघड झाले. अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा येथील पांडुरंग रामभाऊ सोनवणे (35) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पांडुरंग सोनवणे याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवर ताईसाहेबांचा पराभव मी सहन करू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. पांडुरंग सोनवणे याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
पंकजा मुंडे यांचे आवाहन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना शांत आणि सकारात्मक राहण्याचे आवाहन केले आहे. माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या ध्येयासाठी जगा. अंधाऱया रात्रीनंतर सूर्यप्रकाश असतो. तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात, असे ट्विट त्यांनी केले आहे.