
हिंदुस्थानी कसोटी आणि वन डे संघाचा कर्णधार असूनही टी-20 क्रिकेटमधील अपयशी कामगिरीमुळे शुभमन गिलचा आगामी टी-20 वर्ल्ड कप संघातून पत्ता कापण्यात आला होता. आता तशीच स्थिती ऋषभ पंतवर ओढावलीय. विजय हजारे करंडकात चार सामने खेळून केवळ एक अर्धशतकी खेळी केल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याचीही विकेट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र 18 महिन्यांत एकही वन डे संधी न देता जर न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेतून त्याला वगळले तर अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीवर प्रश्नचिन्ह उभे राहील, अशी भावना क्रिकेट वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
11 जानेवारीपासून वडोदऱयात सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. या मालिकेत हजारे करंडकातील कामगिरीची दखल अपेक्षित आहे. त्यामुळे पंत संघात राहणार की जाणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. संघ व्यवस्थापनातील एका सदस्याला पंतचा बेभरवशाचा बेधडक खेळ पसंत नसल्याचे समोर आलेय. मात्र दुसरी संधी न देता पंतसारख्या झुंजार खेळाडूला थेट डच्चू देणे हे अन्यायकारक ठरेल, असे मत अनेक माजी खेळाडूंनी बोलून दाखवले आहे.
2018 मध्ये पदार्पण केल्यानंतर पंत आतापर्यंत फक्त 31 वन डे खेळला आहे. कोविडनंतर तो 15 सामने खेळला असून त्यात त्याने एक शतक, दोनदा 75 पेक्षा अधिक धावांची आणि एकदा 85 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भीषण कार अपघातामुळे त्याची कारकीर्द थांबली. पुनरागमन केल्यानंतर कोलंबोत तो एकमेव वन डे खेळला.
हजारे करंडकात झंझावात गायब
विजय हजारे करंडकातील चार सामन्यांत पंतला 24, 22, 70 आणि 5 अशा खेळय़ा करता आल्या. ही कामगिरी फारशी भक्कम नसली तरी दीर्घकाळ वन डे संधी न मिळालेल्या खेळाडूसाठी ती पूर्णपणे दुर्लक्षित करण्यासारखीही नाही. मात्र याचदरम्यान टी-20 वर्ल्ड कप आणि सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या ध्रुव जुरेल आणि इशान किशनने जोरदार खेळ केला आहे. दोघेही सुपर फॉर्मात असले तरी संघात एकावेळी तीन-तीन यष्टिरक्षकांची निवड शक्य नाहीत. त्यातच के. एल. राहुल हा वन डेत पहिली पसंती आहे. त्यामुळे पंतला वगळण्याचे निवड समितीने धाडस दाखवले तर जुरेल-इशान या दोघांचाही संघात समावेश केला जाऊ शकतो.





























































