
देवनगरी देवरुखच्या भूमीत देवदिवाळीच्या पुण्यप्रसंगी इतिहासातील एक विलक्षण क्षण आकाराला आला. कोकणातील पारंपरिक, औषधी आणि सांस्कृतिक संपत्तीचे प्रतीक ठरणारा सप्तलिंगी लाल भात आता अधिकृतपणे कृषी क्रांतीच्या दिशेने पुढे सरकला आहे.या संपूर्ण उपक्रमाचे संकल्पक, सूत्रधार आणि मुख्य आयोजक म्हणून क्रांती व्यापारी संघटनेने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कृषी, उद्योग, व्यापार आणि बाजार व्यवस्थेच्या धाग्यांना एकत्र करणाऱ्या दृष्टीकोनामुळे हाच क्षण शक्य झाला.
श्री सोळजाई देवीच्या यात्रेनिमित्त सप्तलिंगी लाल भाताचा पहिला पूजन सोहळा ग्रामदेवी देवस्थान मंडळाचे अध्यक्ष बापू गांधी, ए. टी. भुवड, प्रगतशील शेतकरी, कृषी संकल्प प्राईड शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालिका सौ. सुहासिनी पांचाळ आणि व्यापारी प्रतिनिधी प्रीतमशेठ वनकर यांच्या हस्ते पार पडला. या पूजनात देव, परंपरा आणि कृषी जीवनशैली यांचे पुनर्जोड साधले गेले. उपस्थितांनी देवी समोर गाऱ्हाणे घालताना एक सुरात संकल्प व्यक्त केला. “सप्तलिंगी लाल भात जगप्रसिद्ध होऊ दे. सप्तलिंगी लाल भात विक्री व्यवस्थेचे अनावरण आमदार शेखर निकम यांच्याहस्ते झाले. साडवली येथील हॉटेल खाऊचे घर येथे वितरण आणि विक्री व्यवस्थेचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्याहस्ते पार पडले.
याप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडला. यामध्ये शेतकरी आणि व्यापारी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्या हिताचे नाते दृढ राहिले तर शेतीमाल विक्री प्रक्रियेला नवी दिशा मिळते. सप्तलिंगी लाल भातावर अजून संशोधन करून हा ब्रँड सातासमुद्रापार नेणार असल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून मार्केटिंग साठी व्यापाऱ्यांना हाताशी धरून तालुक्यात क्रांती घडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भूमिकेमुळे आज क्रांती व्यापारी, शेतकरी आणि व्यापारी वर्ग यांच्यात ऐतिहासिक सहकार्याचे बीज रुजले.
सप्तलिंगी लाल भाताचे अधिकृत विक्रेते म्हणून साईनाथ कोल्ड्रिंक हाऊस देवरुख, हॉटेल खाऊचे घर साडवली, कांगणे ऑनलाइईन सर्व्हिसेस देवरुख, जुगाई पॅथॉलॉजी लॅब देवरुख या व्यापाऱ्यांनी उस्फुर्तपणे जबाबदारी घेतली आहे. अजूनही सहकार्यासाठी तालुक्यातील अनेक व्यापारी इच्छुक असून त्यांनी नाव द्यावे त्यांना ही सामावून घेऊ असे क्रांती व्यापारीतर्फे स्पष्ट करण्यात आले. ग्राहकांनी आरोग्यदायी चविष्ट सप्तलिंगी लाल भाताला प्राधान्य देऊन वरील अधिकृत ठिकाणी खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांच्या सोबत क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर, राजेंद्र कदम, कृषी संकल्प प्राईड शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आणि लाल भात उत्पादक शेतकरी सौ. सुहासिनी पांचाळ, प्रताप बेटकर हॉटेल खाऊचे घरचे मालक दीपक डोंगरे आणि परिवार उपस्थित होते. तर या उपक्रमामुळे देवनगरी देवरुखची आजची यात्रा एका नव्या स्फूर्तीने रंगून गेली. श्रद्धा, संस्कृती आणि कृषी अर्थव्यवस्थेला समान आदर देणारा हा कार्यक्रम देवनगरीच्या इतिहासात अजरामर ठरणार आहे.






























































