शेतकरी मरतोय, कृषीमंत्री रमीत रमलाय! विधान परिषदेतील व्हिडीओने माणिकराव कोकाटे गोत्यात

नापिकी, सावकरी पाश यामुळे एकीकडे राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे बळीराजा त्रस्त झालेला असताना याच अधिवेशनात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे भर विधान परिषदेत मोबाईलवर जंगली रमी खेळण्यात रमले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांना आज ‘एक्स’पोज केले.

या प्रकाराबद्दल कृषिमंत्र्यांवर चारही बाजूने टीका होत असताना मी काही पाप केले नाही, अशा शब्दांत माणिकराव कोकाटे स्वतःच्या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या काळात महायुतीमधील मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संजय शिरसाट यांच्या खोलीतील पैशांनी भरलेल्या बॅगेचा आणि संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅण्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर आता सभागृहात मोबाईलवर जंगली रमीचा गेम खेळतानाचा व्हिडीओ रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला आहे.

कोकाटेंना धडा शिकवा

शेतकरी मरतोय व कृषिमंत्री रम्मी खेळतोय, या धोकेबाज सरकारला शेतकऱयांशी देणंघेणं राहिलं नाही, म्हणून शेतकरी बांधवांना आवाहन आहे यांना धडा शिकवा, असे काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केले.

कोकाटेंनी आरोप फेटाळले

मी काही पाप केलेले नाही. जाहिरात स्किप करत होतो. तेवढी दोन-तीन सेकंद माझ्या मोबाईलवर जंगली रमीची जाहिरात होती. मी कशाला अशा पद्धतीने गेम खेळत बसू, अशी सारवासारव त्यांनी केली.

मुनगंटीवारांचा रमीला विरोध

‘हा शिष्टाचाराचा, संकेताचा आणि विधानसभेतील आमदारांनी कसे वागावे याचा भाग आहे. विधानसभेची जागा पवित्र आहे. विद्यार्थ्यांनीही खेळू नये, मंत्री आमदार तर दूरच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात पत्ते किंवा रमी यावर कुणी जाऊ नये. स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की, चित्रपटसृष्टीतील लोकांनी रमीची जाहिरात करू नये, याचा अर्थ आम्हीही समजून घेतला पाहिजे,’ अशी भूमिका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली.

शहा सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले…

रमी हा चांगला खेळ आहे. आमीर, शाहरुखही खेळतात.

रोहित पवार यांनी केले ‘एक्स’पोज

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असतानासुद्धा काही कामच नसल्याने कृषीमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. पीक विमा-कर्जमाफी-भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज’’ ही आर्त हाक तुम्हाला ऐकू येईल का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

या मंत्र्याला घरी बसवा, 24 तास जुगार खेळू द्या… विरोधक आक्रमक

‘अशा मंत्र्यांना घरी बसवले पाहिजे, घरी 24 तास रमीचा जुगार खेळू द्या. सभागृह जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते, रमी खेळण्यासाठी नाही. अशा मंत्र्यांना एक मिनिट मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही,’ अशी तोफ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डागली. काँग्रेस व राष्ट्रवादीनेही कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

कोकाटेंवरून छावा आणि दादा गटात हाणामारी, तटकरेंवर पत्ते फेकले

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरमध्ये होते. ‘छावा’च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विश्रामगृहात गाठले. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी तटकरेंवर पत्ते फेकले. त्यावरून हाणामारी झाली. युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे हाणामारीत आघाडीवर होते.