अहिल्याबाई होळकर मैदान बनणार ज्ञान, विरंगुळयाचे केंद्र; कांदिवलीच्या अशोकनगरवासीयांना मिळणार अद्ययावत सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली पूर्व अशोकनगर येथील अहिल्याबाई होळकर मैदानातील वास्तूच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन आज पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे ज्ञान, विरंगुळ्याचे केंद्र आणि वाचनालयामुळे परिसराला नवी ओळख मिळणार असून परिसराच्या  शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसेना नेते, आमदार ऍड. अनिल परब यांच्या विकास निधीतून आणि स्थानिक नगरसेवक सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून या अहिल्याबाई होळकर मैदानातील वास्तूचे नूतनीकरण करण्यात येत आहे. कोषागारात 14 लाख रुपये भरून आणि अधिकृत परवानगी घेऊन आमदार ऍड. अनिल परब यांच्या निधीतून वाचनालय उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम विभागप्रमुख संतोष राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

निधी वाटपात सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर अन्याय

पालिकेतील भाजपशिंदे गटाचे सत्ताधारी विरोधी पक्षांच्या 104 नगरसेवकांवर निधी वाटपात अन्याय करीत आहेत. मुंबई महापौरांच्या प्रभागात एनवॉर्डमध्ये 20 कोटींचा निधी दिला गेला. ते 20 कोटी भाजप आमदाराच्या नावाने देण्यात आले. आता 58 कोटी रुपयांचा निधी दिलाय. सत्ताधाऱयांचा निधीवाटपातील दुजाभावाचा त्यांनी निषेध केला

या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱया युवकांना आणि वाचनप्रेमी नागरिकांना शांत, सुसज्ज आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी विविध पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना सर्वांसाठी खुला होणार आहे. त्याचबरोबर विरंगुळा केंद्र हे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी सामाजिक संवाद, मनोरंजन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.