
काँग्रेसचे अहिल्यागरमधील जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे बुधवारी सकाळी अपहरण करण्यात आले. त्यानंतर मारहाण करून त्यांना निर्जनस्थळी सोडण्यात आले. श्रीरामपूरमध्ये ही घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास सचिन गुजर यांचे अज्ञात व्यक्तींनी चार चाकीतून अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर निर्जनस्थळी सोडून दिले. अपहरण आणि मारहाणीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपहरणाचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर आणि काँग्रेस कार्यकर्ते फिर्याद देण्यासाठी पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस स्थानकाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
सचिन गुजर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पाडले होते. घरापासून काही अंतरावर एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांना अडविले आणि जबरदस्तीने कारमध्ये बसविले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर शहरापासून काही अंतरावर निर्जन ठिकाणी सोडून देण्यात आले. त्यांचा मोबाईलही फोडून टाकण्यात आला.
फडणवीसांच्या बगलबच्यांनी लोकशाहीचा खून पाडला – सपकाळ
दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध करतो. आज संविधान दिनाच्या दिवशी भाजपने सकाळी सकाळी लोकशाहीची हत्या केली आहे. 26/11 च्याच दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदुस्थानवर हल्ला केला होता तोच मुहूर्त साधून अहिल्यानगर जिल्ह्यात देवेंद्र फडणवीसांच्या बगलबच्यांनी लोकशाहीचा खून पाडला आहे. ऐन निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अपहरण करून मारहाण होते हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही, असे ते म्हणाले.































































