
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी केडगाव परिसरात प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. भानुदास कोतकर यांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण राजकीय समीकरणात अक्षरशः उलथापालथ झाली असून, महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. केडगाव येथून कोतकर गटातील सहा उमेदवार मिंधे गटाकडून निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित झाले होते. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. पक्षचिन्ह, एबी फॉर्म, रणनीती सगळे अंतिम टप्प्यात होते. मात्र ऐन वेळेला घडलेल्या एका घटनेने सगळे चित्रच पालटले!
मिंधे गट स्वबळावर, हालचालींना वेग
काल मिंधे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करताच महायुतीत प्रचंड हालचाली सुरू झाल्या. दरम्यान, कोतकर गटाने आधीच केडगावमधून सहा उमेदवारांचे अर्ज अपक्ष म्हणून दाखल केले होते. हेच उमेदवार पुढे मिंधे गटाची अधिकृत उमेदवारी घेणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
मुंबईहून आलेला फोन आणि सगळे गणित बदलले!
मंगळवारी 30 डिसेंबर रोजी दुपारी अचानक मुंबईहून भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याचा फोन भानुदास कोतकर यांना आला आणि त्या एका फोननंतर संपूर्ण राजकीय गणिते कोलमडली. फोननंतर काही मिनिटांतच कोतकर गटाने मिंधे गटाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला आणि मिंधे गटाचा एबी फॉर्म थेट नाकारला. पण दुसरीकडे भाजप त्यांना तीन जागा दिल्यास तयार होते. या तीन जागा घेऊन आम्ही करायचे काय असा जाब कोतकर यांनी संबंधितांना विचारला. मला कोणालाही नाराज करायचं नाही त्यामुळे मी निवडणुकीतून सगळ्यांना माघार घेण्यास सांगणार असल्याचेही ते म्हणाले.
मिंधे गटाला मोठा धक्का, महायुतीतील फाटाफूट उघड
या निर्णयामुळे केडगावमध्ये मिंधे गटाला जबर धक्का बसला असून, महायुतीतील अंतर्गत वाद आणि दबावाची राजकारणे पुन्हा एकदा उघडी पडली आहेत. तो फोन नेमका कुणाचा होता? फोनवर नेमकी काय चर्चा झाली? कोणती हमी देण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे सध्या गुलदस्त्यात असली तरी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
माघारीची मुदत बाकी, पुढील नाट्य अटळ!
सध्या कोतकर गटाचे उमेदवार अपक्ष असले तरी माघारीसाठी अजून मुदत शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या, धक्कादायक आणि नाट्यमय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे.
कोतकर समर्थक पुढे कोणती भूमिका घेतात?
भाजप आणि मिंधेगट यावर काय प्रतिक्रिया देतात?आणि केडगावमधील ही एक घटना संपूर्ण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कौल बदलणार का? या सगळ्या घडामोडींवर आता संपूर्ण नगरचे लक्ष खिळले आहे.



























































