
>> मिलिंद देखणे
अहिल्यानगर जिल्ह्यात दोन वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला. चालू वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे, तर बिबट्यांनी हल्ले करून सुमारे 7 हजार 893 शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे. बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. दक्षिणेच्या तुलनेत उत्तर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र अधिक असल्याने बिबट्यांच्या वावरासाठी उसाच्या फडांचे मोठे लपण आहे. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले जास्त आहेत. अनेकवेळा शेतात काम करणाऱया महिलांवर गिन्नी गवतात लपलेल्या बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. शेतात किंवा घरासमोर खेळणाऱया लहान मुलांवरही बिबट्याने हल्ले करून ठार केले आहे. सन 2023-24 या वर्षात जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या वतीने मृतांच्या वारसांना
नुकसानभरपाईपोटी 90 लाख रुपयांची मदत केली. याच वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 33 जण जखमी झाले होते. जखमी झालेल्यांना वन विभागाच्या वतीने 14 लाख 17 हजार रुपयांची नुकसानभरपाई अदा केली आहे. गतवर्षी बिबट्यांच्या हल्ल्यात 3381 जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये शेळी, मेंढी, गाय, कुत्रा आदी पाळीवर जनावरांचा समावेश होता. या पाळीव जनावरांच्या मालकांना वन विभागाच्या वतीने सुमारे 3 कोटी 42 लाख 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
सन 2024-25 मध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली. चालू वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. नुकसानभरपाईपोटी वन विभागाकडून मृतांच्या वारसांना 1 कोटी 70 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली, तर बिबट्यांच्या हल्ल्यात 47 जण जखमी झाले. जखमी झालेल्यांना 25 लाख 29 हजारांची नुकसानभरपाई वन विभागाने दिली. या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 4 हजार 512 पाळीव पशूंचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या वतीने मृत जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाईपोटी 4 कोटी 38 लाख 78 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे 400 ते 450 बिबट्यांची संख्या आहे. हे बिबटे शेतकऱ्यांच्या वस्तीवरील पाळीव जनावरांवर हल्ले करून शिकार करीत आहेत. दरम्यान, बिबट्यापासून संरक्षणासाठी वन विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात रात्री फिरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच वावर क्षेत्रात ट्रप कॅमेरे लावून बिबट्यांवर सनियंत्रण ठेवण्यात येत आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली.
मानवी वस्तीवर हल्ल्याचे प्रमाण वाढले
बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली असून, मानवी वस्तीवर येऊन बिबटे हल्ले करीत आहेत. गेल्या वर्षभरात जिह्यामध्ये अशाप्रकारच्या घटना घडल्या. यंदाही हे हल्ले थांबायला तयार नाहीत. कालच संगमनेर तालुक्यामध्ये अशाप्रकारची घटना घडली आहे. यामध्ये एका मुलीवर बिबट्याने हल्ला केला. यामुळे शेतकरी भयभीत झाले असून, शेतामध्ये जाण्यासाठी धजावत नाहीत.