अहिल्यानगर झेडपीत होणार चार हजार गुरुजींच्या बदल्या; संवर्ग-दोनमधील 1237 शिक्षक

ahilyanagar-zp-to-transfer-4000-teachers-including-1237-from-category-two

अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. संवर्ग एक व संवर्ग दोनच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. संवर्ग एकमधील 863 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर संवर्ग दोनमधील 374 अशा एकूण आतापर्यंत जिह्यातील 1 हजार 237 शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. अधिकार प्राप्त अवघड क्षेत्रात 573 शिक्षक पात्र आहेत. आता सर्वांत मोठा टप्पा संवर्ग चारमधील आहे. तेथे तब्बल चार हजार शिक्षकांच्या बदल्या अपेक्षित आहेत.

शिक्षण विस्तार अधिकारीपदी समुपदेशनाने पदोन्नती देण्यात आली. त्यात सातजणांना याचा लाभ झाला. अवघड क्षेत्रात तीन वर्षे काम केलेल्या शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार करण्यात आला. संवर्ग दोनमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक पती-पत्नी यांचे एकत्रिकरण करण्यात येते. यासाठी या दोघांच्या शाळांमधील अंतर हे 30 किलोमीटरपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शिक्षक तसेच राज्य सरकार अथवा केंद्र सरकारच्या शासकीय विभागात काम करणाऱया शिक्षक अथवा शिक्षिका यांचे संवर्ग दोनच्या बदल्यांमध्ये एकत्रिकरण करण्यात येते.

संवर्ग एकमध्ये शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्या, तरी या संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांमधील घटस्फोटित, परित्यक्ता, दुर्धर आजाराने पीडित विद्यार्थ्यांचे पालक, गंभीर आजारग्रस्त शिक्षकांना प्रमाणपत्रांची पडताळणी केली जात आहे. कुमारिका तसेच 53 वर्षांवरील शिक्षकांचा या संवर्गात समावेश होतो. संवर्ग चारमध्ये बदल्यांचा मोठा टप्पा आहे. सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा झालेले तसेच एकाच शाळेवर पाच वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांच्या यात बदल्या होणार आहेत.

विस्थापित बदल्यांसाठी पाचवा टप्पा आहे. संवर्ग चारमध्ये बदली ठिकाण न मिळालेल्या शिक्षकांना संधी दिली जाते. अवघड क्षेत्रासाठी सेवा कालावधीची अट नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. संचमान्यतेमुळे यंदा आंतरजिल्हा बदल्या झालेल्या नाहीत.

बदलीनंतर बदलली मानसिकता

जिल्हा परिषदेत आजवर दीड हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानंतर आता संवर्ग चारचा मोठा टप्पा आहे. त्यात चार हजार शिक्षक पात्र होतील. त्यामुळे तब्बल पाच हजारांच्या घरात बदल्या अपेक्षित आहेत. या शिक्षकांना दिवाळीनंतरच बदल्यांच्या ठिकाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. बदली झालेल्या शिक्षकांना नवीन ठिकाणी जाण्याचे वेध लागले आहेत. काही शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र, काहींची मानसिकता बदलली आहे. त्यांचे अध्यापनावर दुर्लक्ष होत आहे.