
>> मंगेश वरवडेकर
जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणजेच सवा लाखापेक्षा अधिक प्रेक्षक क्षमता असा लौकिक असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमची सर्व तिकिटे सोल्ड आऊट होती. सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियममध्ये मुंगी शिरायलाही जागा नव्हती. चक्क क्षमतेपेक्षा दहा हजार प्रेक्षक स्टेडियममध्ये दिसत होते, मात्र जेव्हा आयसीसीने फायनलला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचा अधिकृत 86,824 हा आकडा जाहीर करताच सर्वांच्या भुवया उंचावल्या. जर प्रेक्षक क्षमता सवा लाख, तिकिटे सोल्ड आऊट… स्टेडियमही हाऊसफुल्ल… तर अधिकृत आकडा 86,824 कसा? बाकीचे 38 हजार प्रेक्षक गेले कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मोदी स्टेडियममध्ये तिकिटांचा आणि प्रेक्षकांचा नेहमीच घोळ होत असल्यामुळे गोलमाल है भाई सब गोलमाल है… असे तमाम क्रिकेटप्रेमींच्या मनी शंका उपस्थित झाली आहे.
अहमदाबादला वर्ल्ड कपची फायनल असल्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तिकिटेही सोल्ड आऊट झाली होती. वर्ल्ड कप तिकीट विक्रीचे अधिकृत अॅप असलेल्या बुक माय शोवर तब्बल दीड लाख इच्छुक वेटिंगवर होते. ब्लॅक मार्पेटमध्ये तिकिटांचे रेट गगनाला भिडले होते. तिकिटावर छापील असलेल्या किमतीपेक्षा पाचपट रक्कम जादा घेतली जात होती. ब्लॅक करणारेही असंख्य मैदानाबाहेर खुलेआम तिकिटे विकत होते. फायनलसाठी देशाच्या कानाकोपऱयातून क्रिकेटप्रेमी अहमदाबादला पोहोचले होते. यावरून हिंदुस्थानात क्रिकेटची व्रेझ जगाने अनुभवली.
स्टेडियमची अधिकृत प्रेक्षक क्षमता गोपनीयच
1 लाख 32 हजारांची आसन क्षमता स्टेडियमवर करण्यात आली आहे, मात्र साइट स्क्रीनच्या मागे घेणारे स्टॅण्ड झाकून ठेवण्यात आल्यामुळे सात ते आठ हजार क्षमता कमी झाली आहे. तरीही सामन्यासाठी किती तिकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत, याचा आकडा शेवटपर्यंत गोपनीयच राहिला आहे. याबाबत कुणीही माहिती सांगू शकला नाही. तरी अंदाजे सवा लाखाच्या आसपास आसन क्षमता होती.
घुसखोरच घुसखोर चोहीकडे…
मोदी स्टेडियमची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कमकुवत होती. ज्याला स्टेडियमची माहिती आहे, असा स्थानिक तिकिटाविनाच स्टेडियममध्ये पोहोचत होता. सर्वात धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या गाडय़ांमधून मोठय़ा संख्येने नातेवाईकांना, कुटुंबीयांना, मित्रमंडळींना तिकिटांशिवाय आत सोडले जात होते. ज्यांच्याकडे तिकिटे नव्हती, तेच स्टॅण्डच्या मागे उभे राहत होते, पायऱयांवर बसत होते. यापैकी कुणाला तिकिटाबाबत विचारले असता, ते थेट स्टॅण्डच्या बाहेर निघत होते. पोलिसांनाही या गर्दीचे काही पडले नव्हते. कारण या घुसखोरीत त्यांचाच सिंहाचा वाटा होता. अशी घुसखोरी जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही, पण तरीही अधिकृत प्रेक्षक संख्या इतकी कमी कशी, हा प्रश्न सतावतोच.
86,824 प्रेक्षकच कसे?
स्टेडियम फुल्ल होते. स्टॅण्डच्या मागेही शेकडोच्या संख्येने प्रेक्षक उभे होते. जर प्रत्येकाने तिकिटे काढली होती तर ते स्टॅण्डच्या मागे उभी कशी राहू शकतात, असा प्रश्न पडत होता. एवढेच नव्हे तर हजारोंच्या संख्येने प्रेक्षक पायऱयांवरही बसले होते. पुन्हा तोच प्रश्न तिकिटे असेल तर कुणी पायऱयांवर का बसेल? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सर्व तिकिटे विकली गेलीत. प्रेक्षकही आलेत. सोबतीला घुसखोरही आलेत, तर अधिकृत प्रेक्षक संख्या 86,824 कशी? याचे उत्तर आयसीसी, बीसीसीआय आणि गुजरात क्रिकेट संघटनेकडून अपेक्षित आहे.

























































