
जादा परतावा आणि महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा पैसे देणाऱ्या अनेक कंपन्या अन् त्यांचे घोटाळे आता समोर येत आहेत. जादा परताव्याचे आमिष देत या कंपन्यांनी अहिल्यानगर जिह्यातील विविध तालुक्यांतील नागरिकांचे करोडो रुपये गुंतवून घेतले. त्यानंतर थोडे दिवस परतावाही दिला. त्यानंतर मात्र या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळत अहिल्यानगरमधील नागरिकांना कोटय़वधींचा चुना लावला आहे.
श्रीगोंद्यात ‘इन्फिनाइट बिकनफ’कडून फसवणूक
शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून इन्फिनाइट बिकनफ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, श्रीगोंदा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नितीन अंबादास गांगर्डे (रा. मांदळी, ता. कर्जत) यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधत शेअर बाजारात सुरक्षित गुंतवणूक व दरमहा 6 ते 8 टक्के परताव्याचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून गांगर्डे यांनी इन्फिनाइट बिकनफ प्लॅटफॉर्मवर टप्प्याटप्प्याने एकूण 73 लाख 50 हजार रुपये गुंतवले. या गुंतवणुकीवर एप्रिल 2025 पर्यंत त्यांना एकूण 18 लाख 80 हजार 655 रुपयांचा परतावा मिळाल्यामुळे त्यांनी अधिक रक्कम गुंतवली.
मात्र, मे 2025 पासून परतावा थांबवण्यात आला. विचारणा केली असता, आरोपींनी तांत्रिक अडचण आहे, वेबसाईटचे अपग्रेडेशन सुरू आहे, अशी कारणे देत वेळ मारून नेली. जून महिन्यापर्यंतही परतावा न मिळाल्यामुळे फसवणुकीचा संशय बळावल्याने गांगर्डे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी तत्काळ तपास करून या आर्थिक फसवणुकीप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. दरम्यान, या तक्रारदारांसारखी अनेक लोकांकडून त्यांनी रक्कम जमा केल्याची चर्चा असून, हा घोटाळा करोडोंचा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सुप्यातील कंपनीचा हजार कोटींना गंडा
पारनेर तालुक्यातील सुपा येथील एका कंपनीने दामदुप्पटसह जादा परताव्याचे आमिष दाखवून नगर व पुणे जिह्यांतील शेकडो गुंतवणकदारांना एक हजार कोटी रुपयांना गंडा घातला आहे. या कंपनी मालकाने दुबईला धूम ठोकली असल्याची चर्चा आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून महिन्याला गुंतवणुकीवर 10 ते 12 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून या कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतविल्यास महिना 10 ते 12 हजार रुपये देऊन हजारो कोटी रुपये एजंटच्या माध्यमातून गोळा केले. मात्र, आता दोन महिन्यांपासून व्याज बंद झाले; तसेच गुंतविलेले पैसेही मिळत नसल्याने गुंतवणूकदार चिंताग्रस्त बनले आहेत.
गेल्या दोन वर्षांत दामदुप्पट किंवा जादा परताव्याचे आमिष दाखवून तीन प्रमुख कंपन्यांनी आपले कार्यालय थाटले होते. कोटय़वधी रुपयांच्या ठेवी गोळा करून मनी मॅक्स कंपनीसह अजून दोन कंपन्यांनी सुपा येथून गाशा गुंडाळल्याने हजारो कोटी रुपयांना चुना लागण्याची शक्यता आहे.