
सध्या प्रत्येक क्षेत्रात AI चा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एआयच्या माध्यमातून आपण कित्येक गोष्टींमध्ये वैविध्य आणू शकतो. असे असले तरीही एआय मानवी भावभावनांचा अनुभव देऊ शकत नाही असे मत ख्यातनाम गायक, संगीतकार ए आर रहमान यांनी व्यक्त केले आहे. सॅम ऑल्टमनच्या ओपनएआयसोबत हातमिळवणी करून ‘सिक्रेट माउंटन’ नावाचा एआय-चालित एक आभासी जागतिक बँड त्यांनी तयार केला आहे.
संगीतकार ए. आर. रहमान एआय च्या माध्यमातून तयार होण्याऱ्या गाण्याकडे आतून फार वेगळ्या दृष्टीने पाहताना दिसत आहेत. जुलै २०२५ मध्ये, रहमान यांनी घोषणा केली की, ते सॅम ऑल्टमनच्या ओपन एआयसोबत हातमिळवणी करून ‘सिक्रेट माउंटन’ नावाचा एआय-चालित एक आभासी जागतिक बँड तयार करत आहेत. या वेगाने प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या शक्यतांचा शोध घेत असताना, रहमान एका पैलूबाबत मात्र अगदी स्पष्ट आहेत.
जगभरातील अनेक कलाकार एआयमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल चिंतित आहेत आणि त्यांनी आपली सर्जनशील ओळख जपण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. मात्र रहमान यांना खात्री आहे की, कोणत्याही कलाकाराच्या भावनांची सर एआयला येणार नाही. एआयचा वापर कितीही वाढला तरी, प्रेक्षक हे सुजाण आहेत. ते अस्सल सोन्याच्या शोधातच राहणार आहेत.
सदर कार्यक्रमामध्ये रहमान यांना सिक्रेट माउंटन या ब्रँडचे सदिच्छादूत म्हणून करारबद्ध करण्यात आले आहे. या बॅंडच्या ‘मेड इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत या रहमान यांच्या के. एम. म्युझिक कंझर्व्हेटरी या शाळेतील कलागुणांना पाठिंबा दिला जातो. आपल्या शाळेबद्दल सांगताना ते म्हणाले, “१९७६ मध्ये जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा घरखर्च भागवण्यासाठी आम्ही त्यांची वाद्ये भाड्याने देत असू. एक काळ असा होता की मला वाद्ये विकत घेणे परवडत नव्हते. आज, मी माझ्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या इतरांना संधी देण्याचा प्रयत्न करतो. हिंदुस्थानात एक सृजनशील केंद्र उभारण्याची माझी कल्पना आहे.”
OpenAI च्या सहयोगाने साकारले जाणारे ‘Secret Mountain’ हे, संगीत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा सुरेख मेळ घालणारे एक आभासी जागतिक बँड असणार आहे. जगभरातील संगीतकारांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे, हे या बँडचे मुख्य उद्दिष्ट असेल.



























































