
वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी करणाऱ्या वाहनचालकांना ठाण्यात जोरदार दट्ट्या बसला आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी आर्टिफिशिअल इंटिलिजन्स (एआय) च्या माध्यमातून कार्यान्वित केलेल्या इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमच्या फिरत्या कॅमेऱ्यांनी अवघ्या एका आठवड्यात तब्बल तीन हजार बेशिस्त वाहनचालकांच्या पावत्या फाडल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी शहरात महत्त्वाच्या सिग्नलवर बसवलेल्या १२ एआय कॅमेऱ्यांनी ही किमया केली आहे.
ठाण्यात रॅश ड्रायव्हिंग, सिग्नल तोडी, क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक, नो एण्ट्रीतून घुसखोरी, नो पार्किंगमध्ये सुरू असलेले बिनधास्त पार्किंग, चुकीचे ओव्हरटेकिंगचे प्रमाण वाढले आहे. या बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांच्या मदतीला इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) धावून आली आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजन्सच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या या यंत्रणेच्या माध्यमातून ठाण्यात महत्त्वाच्या सिग्नल्सवर फिरते कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे एआयचलित हाय डेफिनेशन कॅमेरे गोलाकार आणि चौकोनाकार असे फिरत असतात.
साडेतीनशे कॅमेरे बसवणार
एआय कॅमेऱ्यांची फोटो टिपण्याची क्षमता अत्यंत अचूक आणि पारदर्शक असल्याने वाहतुकीचे उल्लंघन करणारे गाडीचालक आणि वाहतूक पोलिसांच्या वादविवादांना आळा बसला आहे. असेच साडेतीनशे कॅमेरे ठाणे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षेत्रात बसवण्यात येणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.
रेकॉर्डवरचा पुरावा
या एमआय कॅमेऱ्यांनी टिपलेले वाहतुकीचे उल्लंघन हे रेकॉर्डवरचे पुरावे म्हणून उपयोगात येत आहेत. या एआय कॅमेऱ्यांनी वाहतुकीचे उल्लंघन करणारे टिपलेले फोटो वाहतूक विभागाच्या सेंट्रल कंट्रोल रूममध्ये पाठवले जातात. तेथून हे फोटो वाहतूक विभागाकडे असलेल्या गाडी मालकाच्या रजिस्टर डेटाबेसवर पाठवले जातात आणि त्यानंतर आपोआप दंडाचे चलन फाडले जाते.
ठाण्यातील अत्यंत रहदारीचे रस्ते असलेल्या तीन हातनाका, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, आनंदनगर, ओवळा, अंजूरफाटा, कल्याण नाका आणि दिघे चौकात एआयचे बारा कॅमेरे बसवण्यात आले आहेत. १ सप्टेंबरला बसवलेल्या या कॅमेऱ्यांनी अवघ्या आठ दिवसांतच तब्बल तीन हजार बेशिस्त वाहनचाल कांना ‘कॅप्चर’ करून त्यांच्या ई-चलन पावत्या फाडल्या आहेत अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.