
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडत आहेत. यासंदर्भात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. एआय साध्या-सोप्या कामांमध्ये माणसांची जागा घेऊ शकते, परंतु जटिल कामे, विशेषत: कोडिंगसारखी कामे हाताळण्यात अद्याप सक्षम नाही, असे गेट्स यांनी म्हटले आहे. यामुळे काही नोकऱ्यांवर परिणाम होऊन बेरोजगारी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
सीएनएनच्या फरीद झकारिया यांना दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांनी एआयच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीबाबत आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, “एआय सध्या साधी कोडिंग करू शकते, परंतु अत्यंत जटिल कोडिंग कामांसाठी अद्याप तयार नाही. तज्ज्ञांमध्ये याबाबत मतभेद आहेत की, एआय पुढील एक-दोन वर्षांत ही क्षमता प्राप्त करेल की त्यासाठी आणखी एक दशक लागेल. मात्र एआयची प्रगती ही आश्चर्यकारक गतीने होत आहे.”
गेट्स म्हटले की, “टेलिसेल्स आणि टेली-सपोर्टसारख्या नोकऱ्या एआयमुळे प्रभावित होऊ शकतात, कारण एआय ही कामे स्वस्तात आणि अधिक अचूकतेने करू शकते. यामुळे अशा क्षेत्रांतील नोकऱ्या कमी होण्याची भीती आहे.”































































