
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाला शौर्य आणि सामर्थ्यांचे दर्शन घडवण्यासाठी सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. हिंदुस्थानी सेना, नौदल आणि हवाई दलाची जय्यत तयारी सुरू असताना हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी बुधवारी सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या नवीन स्वरूपाबद्दल भाष्य केले. हवाई दलाच्या वाढत्या ताकदीचा आणि हिंदुस्थानला मिळालेल्या यशाचा उल्लेख करत त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला. तसेच आपल्याला एक शक्तिशाली सैन्य बनायचे असेल तर लष्करी सामर्थ्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी त्यांनी दिला.
हवाई दलाचे प्रमुख सिंग यांनी अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी हिंदुस्थानी सैन्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवला. सूदानमधील नागरिकांच्या सुटकेची मोहीम असो किंवा दहशतवादी तळांवर केलेले हल्ले, हवाई दलाने प्रत्येक वेळी आपली ताकद सिद्ध केली आहे. आम्ही पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी ठिकाणांवर अवघ्या काही तासांत हल्ला करून त्यांचा कट धुळीस मिळवला होता. आणि हीच आपल्या हवाई दलाची ताकद आहे. आपल्या सैन्याने प्रत्येक कठीण प्रसंगात उत्तम कामगिरी बजावली आहे, असे यावेळी त्यांनी नमून केले.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी लष्करी शक्तीच्या महत्त्वाबद्दल बोलताना ए.पी. सिंग म्हणाले की, कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी केवळ आर्थिक शक्ती पुरेशी नसते. लष्करी ताकद हेच राष्ट्रीय शक्तीचे अंतिम आणि महत्त्वाचे निकष आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. फक्त आर्थिकदृष्ट्या मजबूत असून कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. इतिहास पाहिला तर, एक काळ असा होता जेव्हा हिंदुस्थान आणि चीन जगाच्या 60 टक्के GDP वर नियंत्रण ठेवत होते, तरीही आपल्यावर कब्जा करून आपल्याला गुलाम बनवण्यात आले आहे, असे महत्त्वाचे उदाहरण यावेळी त्यांनी दिले.
मार्गदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यात सिंग यांनी एकता आणि तितकीच मजबूत असलेल्या लष्कराच्या गरजेचे महत्त्व पटवून दिले. तुमच्याकडे शक्तिशाली सैन्य नसेल तर, कोणही तुम्हाला सहज हरवू शकतं. आपल्या डोळ्यासमोर प्रबळ सैन्य नसेल तर कोणताही देश तुमच्यावर हल्ला करू व्हेनेझुएला आणि इराक यांच्यातील युद्धाचे ताजे उदाहरण आहे. सैन्य शक्ती असण्यासोबतच ती वापरण्याची इच्छाशक्ती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. इच्छाशक्तीशिवाय दाखवलेला संयम हा तुमची कमजोरी समजला जातो. तुमच्यात ती ताकद असते आणि तुम्ही योग्यवेळी संयम बाळगता, तेव्हाच त्याकडे तुमची ‘क्षमता’ म्हणून पाहिले जाते, असे यावेळी हवाई दल प्रमुख एपी. सिंग म्हणाले.


























































