
पाकिस्तानच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रापासून देशाला वाचवण्यासाठी हिंदुस्थानची एअर डिफेन्स यंत्रणा एखाद्या भिंतीप्रमाणे उभी ठाकली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा धुव्वा उडाला आहे. हिंदुस्थानने सीएयूस, पेचोरा, समर आणि एडी गनचा वापर करून पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणला.
हिंदुस्थान-पाकिस्तान तणावादरम्यान 7 आणि 8 मेच्या मध्यरात्री पाकिस्तानने पश्चिमेकडील हिंदुस्थानच्या लष्करी तळांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु हिंदुस्थानने इंटिग्रेटेड काऊंटर यूएएस ग्रिडचा वापर करत पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला. यासाठी इंटिग्रेटेड काऊंटर अनमॅन्ड एरियल सिस्टम ग्रिड (आयसीयूएएसजी) आणि बहुस्तरीय संरक्षणाचा वापर करण्यात आला. ही यंत्रणा ड्रोन आणि मानवरहित हवाई प्रणाली (यूएएस) द्वारे निर्माण होणाऱया वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी विकसित केली आहे. त्यामुळे ड्रोनचा वापर अधिक सुलभ होत आहे. बॉर्डरवर पाळत ठेवणे, सीमापार तस्करी रोखणे आणि आपले लक्ष्य निश्चित करून हल्ला करणे शक्य होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आयसीयूएएसजी एक महत्त्वाची यंत्रणा आहे.
‘एस 400’ – हिंदुस्थानचे ‘सुदर्शन चक्र’
एअर डिफेन्स एस 400 म्हणजे आपल्या सैन्याचे सुदर्शन चक्र. एस 400 हे जगातील सर्वात प्रगत लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीपैकी एक आहे. 7 ते 8 मेच्या मध्यरात्री एस 400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांविरुद्ध यशस्वीरीत्या वापर करण्यात आला. एस 400 ने हिंदुस्थानी लष्कराच्या तळांना लक्ष्य करणाऱया अनेक पाकिस्तानी हवाई हल्ल्यांना रोखले. हिंदुस्थानने रशियाकडून पाच एस 400 खरेदी केले आहेत. यापैकी तीन हिंदुस्थानला मिळाले आहेत, तर उर्वरित दोन 2026 पर्यंत मिळणार आहेत. पाच एस 400 साठी हिंदुस्थानने 35 हजार कोटींचा करार केला आहे.
इंटिग्रेटेड काऊंटर-यूएएस ग्रिड
ड्रोनसारख्या मानवरहित विमान प्रणालींचा सामना करण्यासाठी इंटिग्रेटेड काऊंटर-यूएएस ग्रिड उपयुक्त आहे. याअंतर्गत संभाव्य हवाई धोक्यांचा शोध घेण्यासाठी, ओळखण्यासाठी आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी ग्रिड रडार आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी सेन्सर्ससह अनेक तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. शत्रूचा धोका लक्षात आल्यानंतर रेडियो सिग्नल जॅम करण्यासारखे उपाय तत्काळ करता येतात.
‘समर’ ची ताकद
‘समर’ म्हणजे जमिनीवरून हवेत मारा करणारी कमी पल्ल्याची संरक्षण प्रणाली. ‘समर’ ने काल रात्री पाकिस्तानी ड्रोन्सना रोखले.त्याची रेंज 12 किमी आहे म्हणजेच ती कमी उंचीवर उडणाऱया हवाई लक्ष्यांवर, विशेषतः ड्रोनवर मारा करू शकते. सैन्याने ‘आकाश’ सारख्या अन्य शक्तिशाली हवाई संरक्षण युनिट्सचा वापर केला,
ए-125 पेचोरा
ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रs देखील रशियन मूळची आहेत आणि ती ड्रोन, हेलिकॉप्टर आणि अगदी लढाऊ विमानांसह विविध लक्ष्यांवर हल्ला करू शकतात.
पेचोरा हा 1970 च्या दशकात आपल्या सैन्यात समाविष्ट करण्यात आला होता, ज्यामुळे तो समर प्रणाली वापरत असलेल्या व्हिमपेल क्षेपणास्त्रांसारखा पण अधिक प्रभावी आहे.
या सर्व प्रणाली हिंदुस्थानाला हवाई धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रितपणे काम करतात. त्यांना साथ असते ती अत्याधुनिक, बहुउद्देशीय, फ्रान्सनिर्मित राफेलसारख्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांची.