आम्हाला पैसे नको, सत्य जाणून घ्यायचंय; ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटा सार्वजनिक करा, अहमदाबाद विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे मोदींना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबाद विमान अपघातात आपल्या जवळच्यांना गमावलेल्या 30 हून अधिक पीडित कुटुंबांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. एअर इंडियाच्या एआय-171 या विमान दुर्घटनेला 10 महिने पूर्ण उलटून गेले असून अद्यापही अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नाही. त्यामुळे शोकाकूल कुटुंबियांनी ‘ब्लॅक बॉक्स’ आणि ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’चा डेटा सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.

गेल्या वर्षी 12 जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे बोईंग-787-8 हे विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळले होते. विमानतळाजवळील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर हे विमान कोसळले होते आणि या भीषण अपघातामध्ये विमानातील 241 प्रवासी आणि 19 निष्पाप नागरिकांसह 260 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. हा अपघात होऊन 10 महिने उलटून गेले असून अद्यापही विमान अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. यामुळे पीडित कुटुंबांनी एकत्र येत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.

आम्हाला सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई नको आहे. आमच्या माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले सत्य जाणून घ्यायचे आहे, असे पीडित कुटुंबांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच जर हा डेटा सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक करता येत नसेल, तर तो किमान पीडित कुटुंबांना खाजगीरित्या दाखवण्यात यावा, अशी विनंतीही या पत्रातून करण्यात आली आहे.

पीडित कुटुंबांनी विमान कंपनी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मृतांच्या वस्तू ओळखण्यासाठी बनवलेल्या वेबसाईटवर 25 हजारांहून अधिक वस्तूंचे फोटो आहेत. मात्र ते फोटो ते इतके अस्पष्ट आहेत की ओळख पटवणे अशक्य आहे.मृतांच्या वैयक्तिक वस्तू पोर्टलवर सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करणे ही त्यांच्या खासगी आयुष्याची आणि भावनांची थट्टा असल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

तक्रार निवारणासाठी केवळ एक ईमेल आयडी देण्यात आला आहे. मेल केल्यावर उत्तर यायला 15-15 दिवस लागतात. ग्रामीण भागातील नागरिकांना तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे विमान अपघातामध्ये आई, भाऊ आणि मुलगी गमावलेल्या रोमिन वोरा यांनी म्हटले. तर विमान अपघातात 24 वर्षीय मुलाला गमावलेल्या निलेश पुरोहित यांनी आम्हाला पैसे नको, फक्त सत्य जाणून घ्यायचे आहे असे म्हटले.

दरम्यान, अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल गेल्या वर्षी जुलैमध्ये एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे सोपवण्यात आला होता. या अपघाताला जून महिन्या वर्ष पूर्ण होणार असून तोपर्यंत तरी अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे. या अहवालातून विमान अपघाताचे गूढ उकलणार का याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.