नशीबाने वाचलो, मात्र प्रत्येक दिवशी मरणयातना भोगतोय; अहमदाबाद दुर्घटनेत बचावलेल्या विश्वास कुमार असं का म्हणाले?

अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत 242 प्रवाशांचा मृत्यू झाला तर त्यापैकी एकमात्र वाचलेले विश्वास कुमार रमेश नशीबवानच म्हणायला हवा. अनेकजण याला चमत्कारच मानत आहेत. पण विश्वासकुमार त्या अपघातातून बचावले मात्र वास्तविक आयुष्यात ते अजूनही सावरलेले नाहीत. त्यांना शारीरीक आणि मानसिक रित्या प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. ते म्हणतात मी फार नशीबवान आहे एवढ्य़ा मोठ्या अपघातातून बचावलो मात्र त्या अपघाताने माझे आय़ुष्य बदलून गेले. अपघाताच्या चार महिन्यानंतर रमेश यांनी आपल्या वेदनांना वाट मोकळी केली.

विश्वासकुमार लंडनला जाणारे विमान AI 171 ने प्रवास करत होते. विमान अहमदाबादमधील एका वैद्यकीय वसतिगृहात कोसळले. विमान अपघातात एकूण 242 जणांचा मृत्यू झाला. तर एकमेव प्रवासी बचावले होते. अपघातानंतर ते ढिगाऱ्यातून बाहेर पडताना दिसले, मात्र त्यांचा धाकटा भाऊ अजय या अपघातात मृत्युमुखी पडला. तो विमानाच्या पुढच्या सीटवर बसला होता. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, “मी एकटाच जिवंत आहे. मला अजूनही विश्वास बसत नाहीये. हा चमत्कारच आहे. पुढे ते म्हणाले की, त्याच्या भावाला गमावल्याचे दुःख अजूनही झोपू देत नाही. “माझा भाऊ माझी ताकद होता. गेल्या काही वर्षांत तो प्रत्येक अडचणीत माझ्यासोबत होता. आता मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. ना मी माझ्या पत्नीशी बोलत ना माझ्या मुलाशी बोलत. मी फक्त माझ्या खोलीत एकटाच मरणयातना भोगतोय”

अपघातानंतर, डॉक्टरांनी त्यांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) असल्याचे निदान केले. रमेश म्हणाले की त्यांचे संपूर्ण कुटुंब अद्याप या दुर्घटनेतून सावरलेले नाही. “माझी आई दररोज दाराशी बसते, ती कोणाशीही बोलत नाही. मलाही कोणाशी बोलावेसे वाटत नाही. आमच्यासाठी प्रत्येक दिवस वेदनादायी आहे असे ते म्हणाले.