
बागडोगरा (सिलिगुडी) येथून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. धुराचा अलार्म वाजल्याने चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुरक्षित उतरवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
एअरबस ए320 हे विमान सोमवारी सायंकाळी सिलिगुडीहून दिल्लीला चालले होते. चालवले जाणारे हे विमान (IX1523), सोमवारी संध्याकाळी लखनौकडे वळवण्यात आले. विमानातील एव्हियोनिक्समधून धूर येत असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने लखनऊमधील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला मेडे कॉल दिला. यानंतर विमानाने सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी लखनऊमधील विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग केले.
विमानात सहा कर्मचाऱ्यांसह एकूण 148 जण होते. लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यानंतर विमानाला ‘एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड’ (AOG) घोषित करण्यात आले. प्रवाशांना पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. काही प्रवाशांना पूर्ण परतावा देण्यात आला, तर इतरांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय करून देण्यात आली. यानंतर दुसऱ्या विमानांमध्ये त्यांचे तिकीट पुन्हा बुक करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.





















































