आजपासून एअर इंडियाचा प्रवास महागणार! 399 रुपयांपासून 8 हजारांपर्यंत जास्त पैसे मोजावे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा फटका वेगवेगळ्या क्षेत्रांना बसला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 60 रुपयांनी महाग झाल्या आहेत. आता युद्धामुळे एअर इंडियाचा विमान प्रवाससुद्धा उद्या, गुरुवारपासून महाग होणार आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस 12 मार्चपासून देशांतर्गत विमान उड्डाणांवर 399 रुपयांचा इंधन अधिभार (फ्युअल सरचार्ज) लागू करणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही इंधन अधिभार वाढवला जाणार आहे. त्यामुळे एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना आता तिकिटासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

एअर इंडिया समूहाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन अधिभार सिस्टम टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 मार्चपासून देशांतर्गत आणि दक्षिण आशियाई क्षेत्रात उड्डाण करणाऱ्या उड्डाणांवर 399 रुपये प्रति तिकीट फ्युअल सरचार्ज लागू केला जाणार आहे. पश्चिम आशियात जाणाऱ्या उड्डाणांवर फ्युअल सरचार्ज 10 अमेरिकन डॉलर असेल. आफ्रिकेत जाणाऱ्या उड्डाणांसाठी 30 अमेरिकी डॉलरने वाढून 90 अमेरिकन डॉलर केले जाईल, तर दक्षिण पूर्व आशियातील सेवेसाठी 20 अमेरिकन डॉलरने वाढून 60 अमेरिकन डॉलर केले जाईल. यामध्ये सिंगापूरच्या उड्डाणांचाही समावेश आहे. सध्या सिंगापूरच्या हवाई सेवांवर कोणतेही फ्युअल सरचार्ज आकारले जात नाही. दुसरा टप्पा हा 18 मार्चपासून लागू केला जाईल.

युरोपमध्ये जाणाऱ्या फ्लाइट्सवर 125 अमेरिकन डॉलर सरचार्ज लागू केला जाईल. नॉर्थ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या फ्लाईटवर 200 अमेरिकन डॉलर सरचार्ज लागू केला जाईल, तर तिसऱ्या टप्प्यात हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियाला जाणाऱ्या उड्डाणावर सरचार्ज लागू केला जाईल. सध्या आखाती देशांत जी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे जेट इंधनांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे एअर इंडिया कंपनीला फ्युअल सरचार्ज लावण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे.

एअर इंडियासोबत एअर न्यू झीलँड, हाँगकाँग एअरलाइन्स, जपान एअरलाइन्स, ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी विमान पंपनी क्वांटास, स्पाइसजेट या विमान कंपन्यांनीही सरचार्ज वाढवण्याची तयारी केली आहे. क्वांटासने आंतरराष्ट्रीय मार्गावर धावणाऱ्या उड्डाणांवर 5 टक्के तिकीट दर वाढवले आहेत. जपान एअरलाइन्स 1 एप्रिलपासून फ्युअल सरचार्ज वाढवणार आहे.