एअर इंडियाच्या सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली विमानात तांत्रिक बिघाड, मंगोलियामध्ये इमर्जन्सी लँडिंग

सॅन फ्रान्सिस्कोहून कोलकातामार्गे दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान कर्मचाऱ्यांनी हवेतच तांत्रिक बिघाडाची तक्रार केल्यानंतर खबरदारी म्हणून मंगोलियातील उलानबातर येथील विमानतळावर विमान सुरक्षित उतरवण्यात आले.

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी घटनेची पुष्टी केली आहे. विमान उलानबातर येथे सुरक्षितपणे उतरले असून विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. विमानाची आवश्यक तांत्रिक तपासणी सुरू असल्याचे एअरलाइनच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

एअर इंडियाचे AI174 हे विमान 2 नोव्हेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्कोहून कोलकातामार्गे दिल्लीला चालले होते. हवेतच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय उड्डाण कर्मचाऱ्यांना आल्यानंतर मंगोलिया येथे खबरदारी म्हणून लँडिंग केले. विमान उलानबातर येथे सुरक्षितपणे उतरले. विमानाची आवश्यक तपासणी सुरू आहे. अनपेक्षित परिस्थितीमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. एअर इंडियामध्ये, प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी एअर इंडियाचे अधिकारी मंगोलियातील विमानतळ अधिकाऱ्यांशी आणि स्थानिक ग्राउंड टीमशी समन्वय साधत आहेत. प्रवाशांसाठी जेवण, निवास आणि पुढील प्रवासाची व्यवस्था केली जात आहे.