
दिवाळीत पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरात प्रदूषण कमी पातळीवर राहिले. मात्र पाऊस थांबल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब पातळीवर नोंद होत चालली आहे. शुक्रवार पाठोपाठ शनिवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली. शहराच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 117 अंकांवर नोंदवला गेला. हवेमध्ये धुळीचे कण वाढल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
शनिवारी वांद्रेमध्ये 112, वांद्रे कुर्ला संकुल येथे 147, भोईवाडा – 127, कुर्ला- 124, मालाड – 127 तसेच वडाळा ट्रक टर्मिनल परिसरात 139 अंक अशा प्रकारे हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली. पावसामुळे ऑक्टोबर महिन्यात हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत नोंदवली गेली. मात्र पुन्हा शुक्रवारी आणि शनिवारी हवेची मध्यम श्रेणीत नोंद झाली.
मुंबईकर आधीच उकाड्याने त्रस्त झाले असतानाच आता हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे त्यांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार असलेल्यांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रदूषित हवेत दीर्घकाळ काम करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.




























































