विमान प्रवाशांच्या खिशाला कात्री; ६० टक्के ‘फ्री सीट’चा नियम केंद्र सरकारकडून स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानाने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) विमान कंपन्यांना ६० टक्के जागा विनामूल्य (Free Seats) देण्याचा सक्तीचा नियम तात्पुरता स्थगित केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खासगी विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता प्रवाशांना आपल्या आवडीची जागा निवडण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

काही काळापूर्वी सरकारने विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण क्षमतेपैकी ६० टक्के जागा प्रवाशांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देणे बंधनकारक केले होते. वेब चेक-इन दरम्यान प्रवाशांनी स्वतःहून जागा निवडली नाही, तरी त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय या जागा उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र विमान कंपन्यांनी या नियमाला विरोध करत यामुळे महसुलावर परिणाम होत असल्याची तक्रार केली होती. विमान कंपन्यांच्या याच मागणीचा विचार करून मंत्रालयाने आता हा नियम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचा थेट परिणाम विमान तिकीट दरांवर आणि प्रवाशांच्या नियोजनावर होणार आहे. आता विमान कंपन्यांना त्यांच्या सोयीनुसार अधिक जागा पेड (Paid Seats) वर्गात ठेवण्याची मुभा मिळणार आहे. म्हणजेच खिडकीजवळील जागा किंवा जास्त लेग-रूम असलेल्या जागांसाठी प्रवाशांना आता पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागू शकते.